पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळ्यांवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अजोड आहे. या शिवायही डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाला अनेकविध पैलू आहेत. नव्या पिढीला ते समजावून सांगण्यासाठी बाबासाहेबांविषयी वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तींनी काय काय लिहिलं आहे ते आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन अशा दोन भागात ‘डॉ. आंबेडकर दर्शन’ या पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे.

धनंजय कीर हे ख्यातनाम चरित्रकार. बाबासाहेबांच्या चरित्रात ते लिहितात, ‘‘नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते नि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व आहे. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ते एक सोनेरी पान आहे. स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येने, अलौकिक धैर्याने नि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो तो धुळीतून धुरंधराच्या मालिकेत जाऊन कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे उदाहरण आधुनिक भारतात अन्यत्र सापडणे कठीण आहे,’’

डॉ. आंबेडकरांच्या अफाट कर्तृत्वाचे वर्णन करताना धनंजय कीर पुढे म्हणतात, ‘‘परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्धधर्माची दीक्षा दिली. भारतीय समाजाला सामाजिक समतेची, मानव्याची नि बुद्धिप्रामाण्यवादाची जाणीव देणारा हा धर्म आहे. त्यात कारुण्य नि विवेक यांचे दर्शन घडते. बौद्ध धर्माची दीक्षा देऊन भारतातील लोकशाहीनिष्ठ समाजवादाला त्यांनी नैतिक अधिष्ठान दिले आहे, असे म्हणणे योग्य होईल. बौद्ध धर्म देव मानीत नाही. आत्मा मानीत नाही. अर्थात मूर्तीची पूजा करून देव पावतो, असे आता त्यांच्या अनुयायांना म्हणता येणार नाही. मोक्षप्राप्तीची व स्वर्गाची कल्पना सोडून दिली पाहिजे. पूज्य बाबासाहेबांनीच सांगून ठेवले आहे, की मरणोत्तर मोक्षप्राप्तीकरिता तळमळणारी वृत्ती ही काल्पनिक आहे. स्वर्गीय नंदनवनावर खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी ठरली आहे.’

आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाबासाहेबांवर लिहिलेला लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या महत्तेचं वर्णन अत्रे यांनी अगदी नेमकेपणाने केलं आहे. ते म्हणतात, ‘जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते, तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागले नसेल.’

सात कोटी अस्पृश्यांच्या आत्मसन्मानासाठी सगळं आयुष्य पणाला लावणाऱ्या डॉ. आंबेडकरांना उर्वरित समाजाकडून सतत टीकेचं धनी व्हावं लागलं. त्याबद्दल अत्रे म्हणतात, ‘आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचे पद मिळवता आले असते! त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळविले असते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्यांचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही. पण ब्रिटिशांची सेवावस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या ‘देशभक्ती’ चा गणवेशही अंगावर त्यांनी चढविला नाही! सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वागावर काटेरी वस्त्रे चढविली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले.’

डॉ. बाबासाहेबांच्या हिंदूूधर्मत्यागाच्या घोषणेवर समाजात प्रचंड टीका झाली होती. त्याबद्दल अतिशय सुंदर विवेचन आचार्य अत्रे यांनी केलं आहे. ते म्हणतात, ‘धर्मातराची घोषणा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘‘माझ्या धर्मातराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही.’’ सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर बुद्धाचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी त्यांची खात्री झाली, म्हणूनच त्यांनी तो धर्म स्वीकारायचे ठरविले. ते म्हणाले, ‘‘बुद्धाचा धर्म हा खरा मानवी धर्म आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे. तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे. बुद्धाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे. त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेले आहे. मानवतेला आणि सदसद्विवेकबुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच त्या धर्माने ग्रा मानलेल्या आहेत.’’ महात्मा गांधींनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ बोलावून स्पृश्यांच्या दयेचा आणि सहानुभूतीचा विषय बनवले. पण आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना ‘बौद्धजन’ बनवून त्यांच्या मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा चिरंतन दीपस्तंभ त्याच्यासमोर बांधून ठेवला.’

या निर्णयामुळे बाबासाहेबांवर झालेल्या टीकेचा समाचार त्यांनी या लेखात घेतला आहे. अत्रे लिहितात, ‘हिंदुधर्मावर सूड घेण्यासाठी आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ही गोष्ट खोटी आहे. हिंदू धर्मावर त्यांना सूड घ्यावयाचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता, पण ‘भारताच्या इतिहासात देशाचा आणि धर्माचा विध्वंसक म्हणून माझे नाव राहावे अशी माझी इच्छा नाही!’ असे ते नेहमी म्हणत. भारताच्या अखंडत्वावर त्यांची गाढ श्रद्धा होती. घटना समितीच्या पहिल्याच बैठकीत ‘हिंदुस्थान हा काही झाले तरी अखंडच राहिला पाहिजे. मुस्लीम लीगचे पाकिस्तानचे धोरण चूक आहे!’ अशी घोषणा करून आपल्या प्रखर राष्ट्रीय बाण्याने आपल्या सर्व विरोधकांचे डोळेच दिपवून टाकले होते. ‘पाकिस्तान’ वर एक प्रचंड ग्रंथ लिहून देशाची फाळणी करताना कोणत्या गोष्टीची सावधगिरी घेतली पाहिजे याचे त्यांनी नि:संदिग्ध मार्गदर्शन केले होते.

ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या ‘मुकियांचा मुखत्यार’ या लेखात बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे नेमके वर्णन केले आहे. ‘डॉ. आंबेडकरांनी कष्टाने विद्या मिळविली आणि केवळ पदवी घेण्यापुरता त्यांचा विद्येशी संबंध नव्हता. ते प्रकांडपंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेले लिखाण व त्यांची भाषणे याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नव्हे, तर सर्व समाजाने व त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावयास हवा. कोणतेही विधान पुराव्याशिवाय ते करीत नसत आणि त्यांचा भर युक्तिवादावर होता. स्वत:च्या मतांवर त्यांची श्रद्धा होती आणि ती मते मांडून लोकांचे मतपरिवर्तन करण्याची तळमळ होती. ’

‘नवसमाजरचनेचा स्मृतिकार’ या लेखात डॉ. भालचंद्र फडके लिहितात, ‘१९२३ साली डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळविणारे ते पहिलेच भारतीय विद्यार्थी असावेत. डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे अध्ययन केले त्यामुळे दलित जाती-जमातींना जे दारिद्रय़ भोगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांचे सर्व बाजूंनी होणारे आर्थिक शोषण, हे त्यांच्या लक्षात आले. आर्थिकदृष्टय़ा परावलंबी असलेला हा समाज जी मानसिक गुलामगिरी भोगत होता त्याचे मूळ हिंदू समाजव्यवस्थेत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांना अस्पृश्यतेच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेगवेगळी पावले उचलली.’

खरा पुढारी शोधला..‘‘तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.’’
– राजर्षी शाहू महाराज

आंबेडकरांनी यश लाभास आणले‘‘डॉ. आंबेडकरांमुळे आपले सारे प्रयत्न आणि पैसाही सार्थकी लागला. आज एका महत्कार्याची सफलता झालेली पाहिली. यश लाभास आले.’’
– सयाजीराव गायकवाड

बाबासाहेबांचे विराट कार्य नेमकेपणाने वर्णन करणे म्हणजे खरं तर मोठे आव्हान पेलण्यासारखेच. ते पोलतना डॉ भालचंद्र फडके म्हणतात, ‘डॉ. आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अखंड, उग्र ज्ञानसाधना होती. ते खरेखुरे क्रियावान पंडित होते. भगवान बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि जोतिरावांची बंडखोरी बरोबर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाच एक विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला आहे. डॉ. आंबेडकरांनी विविध पुस्तकांतून अस्पृश्यता निर्मूलनाच्या आपल्या लढय़ाची तात्त्विक भूमिका मांडली. दुसऱ्या आघाडीवर गोलमेज परिषदेपासून तो घटना परिषदेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हक्कांची मागणी केली आणि तिसऱ्या आघाडीवर अस्पृश्यांना एका झेंडय़ाखाली आणण्यासाठी रक्ताचे पाणी केले. तसेच सभा, परिषदा, मेळावे, वार्ताहर परिषदा, बैठका, चर्चा इत्यादी अनके मार्गानी जनजागरणाचा वेग कायम ठेवला.’

बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व प्रा. गं. बा. सरदार यांनी ‘तरुणांच्या आकांक्षांचे प्रतीक’ या लेखात नेमक्या शब्दात मांडलं आहे. ते म्हणतात, ‘इंग्लंड- अमेरिकेच्या विद्यापीठीय वातावरण वावरल्याने डॉ. आंबेडकरांच्या पाश्चात्त्य उदारमतवादाचे दृढ संस्कार झाले होते. भारताची राष्ट्रीय एकात्मता अभंग राहिली पाहिजे, याबद्दल त्यांना इतर मोठमोठय़ा राष्ट्रीय नेत्यांइतकीच कळकळ होती. संसदीय लोकशाहीवर तर त्यांचा अढळ विश्वास होता; पण राजकीय पक्ष व कामगार संघटना यांचे नेते राजकीय व आर्थिक प्रश्नांवरच सर्व लक्ष केंद्रित करून सामाजिक प्रश्नांची अगदीच उपेक्षा करीत होते, असा अनुभव त्यांना वारंवार आला.’

विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास शब्दबद्ध करणारे इतिहास संशोधक डॉ. य. दि. फडके ‘बाबासाहेबांचा लढा सर्व अल्पसंख्याकांसाठी’ या लेखात म्हणतात, ‘१९४७ साली साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. तेव्हा बाबासाहेबांनी सरळ सांगून टाकले, ‘‘मंदिरप्रवेशावर त्या वेळी (१९३०-३१) माझा विश्वास होता. पण मागून ती चूक माझ्या लक्षात आली. माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या आहेत. पण त्या चुका मला कळून आल्यानंतर पुन्हा मी त्या केल्या नाहीत. त्या वेळी मला वाटले होते, की आम्हीही माणसेच असल्याने आम्ही असल्या मानवी हक्कांना का मुकावे? ते मानवी हक्क मिळवावे त्यासाठी सत्याग्रह करावा, तसाठी वाटेल त्या हालअपेष्टा भोगाव्यात, असे मला वाटत होते. पण आता मी अनुभवाने शहाणा झालो आहे. अशा तऱ्हेच्या झगडय़ात काही तथ्य नाही अशी आता माझी पूर्ण खात्री झाली आहे.’’

तर प्रबोधनकार ठाकरे यांनी दलित समाजाला उद्देशून ‘तुमच्या भाग्याचा तरणाजवान पुढारी’ असं बाबासाहेबांचं वर्णन केलं होतं. ते म्हणतात, ‘‘तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान, तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढय़ांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकराला जाऊन भेटा. तोच तुमचे कल्याण करणा. बाकीचे आम्ही सारे बाजूने पोहणारे. समजलात? ’’

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, प्रबोधन, संबंधित भाषणं यांचं संकलन आहे. या सगळ्यामुळे  पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.

डॉ. आंबेडकर दर्शन, लेखन व संपादन- मनीष कांबळे, समता विकास प्रकाशन, पृष्ठे : २२४, मूल्य : २२० रुपये
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

(दोन वर्षांपूर्वी लोकप्रभामध्ये आलेला हा लेख जयंतीनिमित्तानं पुन्हा प्रकाशित करत आहोत.)