जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढतच आहे. सर्व सामान्य जनतेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, परिचारीकांसह सीमेवर लढणारे जवान देखील करोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.   मागील 24 तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) आणखी 21 जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोवीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये या सर्व जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या एकूण 120 जवान करोनाबाधित आहेत. तर, आतापर्यंत 286 जवान करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णलायातून सुट्टी देण्यात आलेली आहे. बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सच्यावतीने ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशभरात मागील चोवीस तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली आहे. देशभरातील या तब्बल 1 लाख 25 हजार 101 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे.