उत्तर प्रदेशातील बुलंदशहमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी प्रशांत नट याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बुलंदशहराचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी ही माहिती दिली. प्रशांत नटनेच सुबोध सिंह यांची हत्या केली होती. आता याप्रकरणी प्रशांत नटला अटक करण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. ज्या रिव्हॉल्वरने सुबोध सिंह यांची हत्या करण्यात आली ते अजून आम्हाला मिळालेले नाही असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

बुलंदशहर या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सुबोध सिंह यांची हत्या झाली. त्यानंतर पोलीस या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेत आहेत. बुधवारी सुबोध सिंह यांची हत्या प्रशांत नटने केली तो या प्रकरणातला मुख्य संशयित आहे असे उत्तरप्रदेशचे एडीजी आनंद कुमार यांनी म्हटले होते. त्यानंतर तीन ते चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि प्रशांत नटला अटक करण्यात आली. आत्तापर्यंत सुबोध सिंह यांच्या हत्याप्रकरणात योगेश राज याचा हात आहे असे मानले जात होते. चौकशीदरम्यान प्रशांत नट याने सुबोध सिंह यांच्यावर गोळीबार केल्याचे मान्य केले आहे.

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. बुलंदशहर या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारामध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांची हत्या झाली. तर आणखी एक तरुण मारला गेला होता. 3 डिसेंबरला झालेल्या या हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारातील गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष तपास पथकही स्थापण्यात आलं आहे.