गेल्या वर्षी आलेल्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाला शोभावी अशी घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीच्या एका कोट्यधीश उद्योगपतीने आपल्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी गरीब असल्याचा बनाव केला. स्वतः गरीब असल्याचा बनाव करुन या उद्योगपतीने मुलाला देशातील नामांकित ‘संस्कृती स्कूल’मध्ये प्रवेश मिळवून दिला. हा बनाव उघडकीस आल्यानंतर चाणक्यपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पाच वर्षांपूर्वीचं म्हणजे 2013 चं हे प्रकरण आता छोट्या मुलाच्या शाळेतील प्रवेशाच्यावेळीस उघडकीस आलं आहे.

गौरव गोयल असं या उद्योगपतीचं नाव आहे. त्यांनी चाणक्यपूरी जवळील झोपडपट्टी म्हणजे संजय कॅंप हा आपला पत्ता दाखवला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे वर्षभराची कमाई केवळ 67 हजार असल्याचं त्यांनी दर्शवलं. जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र देखील खोटं बनवून एमआरआय सेंटरमध्ये काम करत असल्याचं त्यांनी शाळेत सांगितलं आणि 2013 मध्ये मोठ्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून दिला.

असा उघडकीस आला बनाव –
आता आपल्या छोट्या मुलाच्या प्रवेशासाठी गौरवने सिबलिंग कोट्यातून (भावंडांचा कोटा) प्रयत्न केले. शाळेने गौरवच्या पहिल्या मुलाचे कागदपत्र तपासले असता, आता माझी कमाई वाढली असल्याचं त्यांनी शाळेला सांगितलं. शंका आल्यामुळे शाळा प्रशासनाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गौरवला जवाहर कॉलनीतील त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तिसरीत शिकणा-या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे.

गौरव गोयल हा एमआरआय सेंटरमध्ये काम करतो अशी खोटी माहिती त्याने दिली होती. पण तो तेथे काम करत नाही तर त्या एमआरआय सेंटरचा तो मालक आहे. तसंच तो डाळींचा मोठा व्यापारी आहे. याशिवाय आतापर्यंत त्याने जवळपास 20 देशांमध्ये प्रवास केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

गौरवला कोर्टात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्या पद्धतीने गौरवने खोटे कागदपत्रं बनवले त्यावरून पोलिसांनी काही सरकारी अधिकारी देखील यामध्ये अडकू शकतात असं म्हटलं आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.