केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अपयश स्वीकारले आहे अशी टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. मागील तीन वर्षांच्या काळात आपण कसे सपशेल अपयशी ठरलो, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे. राजीवप्रताप रूडी, बंडारू दत्तात्रेय, कलराज मिश्रा या आणि इतर मंत्र्यांचे राजीनामे घेणे म्हणजेच त्यांच्या खात्यांच्या बाबतीत मोदी सरकार अपयशी ठरले आहे स्वीकारणेच आहे, असेही मनिष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते बोलत होते.

एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ म्हणजे ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ असल्याचीही तिखट प्रतिक्रिया मनिष तिवारी यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहेऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र यातील बहुतांश लोकांचे वय ६० किंवा त्या पुढचेच आहे. ज्या मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे त्यांना फक्त ‘खास’ लोकांची कामे करण्यासाठी पदावर नेमले गेले आहे. या सगळ्यांनी आत्तापर्यंत सामान्साय जनतेसाठी कामे केलेली नाहीत,असाही आरोप तिवारी यांनी केला आहे.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत मनिष तिवारी पत्रकारांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला ऐकायला थोडे विचित्र वाटेल मात्र मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराच्या संपूर्ण प्रक्रियेत नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध दिसून आला नाही, उलट अमित शहा हेच पंतप्रधान असल्यासारखे वागत होते. पंतप्रधानांना मंत्रिमंडळ विस्ताराशी काही घेणेदेणे नव्हते का? असाही प्रश्न तिवारी यांनी विचारला आहे.

पीयुष गोयल यांच्याकडे रेल्वे खाते दिले आहे. आता तरी या खात्याचा कारभार सुधारतो का आणि अपघात थांबतील के ते पाहू, असेही मनिष तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारीच गुलाम नबी आझाद यांनी, कामगिरी हा निकष असेल तर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पद सोडावे अशी मागणी केली होती. आता मनिष तिवारी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे.