सियाचीन, डोकलाम आणि लडाख या उंचावरील युद्ध क्षेत्रात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. हिवाळयासाठी आवश्यक असणारा विशेष पोषाख, स्नो गॉगल्स, बूट आणि अन्य साहित्याचा तुटवडा आहे. त्याशिवाय, जवानांना उष्ण कॅलरी युक्त पोषक आहार सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. कॅगच्या अहवालातून या बाबी उघड झाल्या आहेत.

लष्कराच्या मुख्यालयामध्ये जे राखीव सामान असते, तिथे उंचावरील युद्ध क्षेत्रात तैनातीसाठी लागणारे कपडे आणि साहित्याची कमतरता आहे. निधीच्या मर्यादा असल्या तरी, लवकरच ही कमतरता भरुन काढू असे संरक्षण मंत्रालयाकडून कॅगला सांगण्यात आले आहे.

“२०१५-१६ ते २०१७-१८ च्या कालावधीतील हा अहवाल आहे. आता परिस्थितीमध्ये मोठया प्रमाणात सुधारणा झाली आहे. प्रत्यक्ष सियाचीनमध्ये  तैनात असलेल्या जवानांसाठी हिवाळी पोषाख आणि साहित्याची कुठलीही कमतरता नाहीय. सियाचीनमध्ये तैनात असणाऱ्या एका जवानाच्या पोषाखाचा खर्च एक लाख रुपये आहे. आपण हा पोषाख आयात करत असलो तरी, हा खर्च कमी व्हावा यासाठी स्वदेशी पोषाख निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.