कारगिल युद्धात पाकिस्तानी जवानांनी अनन्वित छळ करून ठार मारलेला हुतात्मा कॅप्टन सौरभ कालिया याच्या मृत्यूप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्यास मोदी सरकारने नकार दिला, पण नंतर घूमजाव करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला असल्याचे सांगितले. हे अपवादात्मक प्रकरण असून सर्वोच्च न्यायालयाचे मत अजमावल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली जाईल असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. दरम्यान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी उदयपूर येथे सांगितले की, या प्रश्नावर चर्चा झाली आहे व आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्र बदलणार आहे. सौरभ कालिया याला तापत्या सळईने डाग देण्यात आले होते. हातपाय तोडण्यात आले होते तसेच डोळे फोडून, डोक्याचेही तुकडे केले होते नंतर या छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह भारताच्या ताब्यात देण्यात आला होता. यू टय़ूबवरील एका व्हिडिओत कालियाचा पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी कसा छळ केला हे त्यांच्याच जवानाने सांगितले होते. मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद न मागण्याच्या मुद्दय़ावर काँग्रेसने मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर सरकारने लगेच भूमिका बदलून हा पर्याय खुला असल्याचे सांगितले.
या प्रकरणी पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणे व्यवहार्य होणार नाही असे मोदी सरकारने होते. खासदार राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. के. सिंह यांनी असे सांगितले होते की, या घटनेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्यात आले व त्यात पाकिस्तानी जवानांच्या क्रू रतेचे वर्णनही संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत २२ सप्टेंबर १९९९ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात केले होते. एप्रिल २००० मध्ये हे प्रकरण मानवी हक्क आयोगापुढे दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याबाबत चाचपणी करण्यात आली पण ते योग्य ठरणार नाही, असे सांगण्यात आले होते. कालियाचे वडील एन. के. कालिया यांनी २०१२ मध्ये या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली होती. काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय निषेधार्ह असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करावे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न जाण्याने हुतात्मा जवानांचा अवमान झाला आहे असे काँग्रेसने म्हटले होते.