खोट्या विधानांचा दाखला देत पुणे पोलिसांनी आपल्यावर खटला दाखल केल्याचा आरोप कवी वरवरा राव यांनी केला आहे. कथित नक्षलवादी समर्थक असल्याचा कारणावरुन अटक करण्यात आलेल्या देशभरातील पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी राव हे एक आहेत. सुप्रीम कोर्टाने अटक न करता स्नानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर ते हैदराबाद येथील आपल्या घरी परतले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राव म्हणाले, मी सुरुवातीपासून सांगत आहे की माझ्या तोंडी खोटी विधाने घालून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी माझा कोर्टावर विश्वास आहे. यातून आम्ही नक्कीच बाहेर पडू.

सुप्रीम कोर्टाने बुधवारी पुणे पोलिसांच्या अटकेच्या कारवाईला स्थगिती देत वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलाखा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेला ६ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली तसेच त्यांना त्यांच्या घरात स्नानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, लोकशाहीत मतभिन्नता असणे हे स्वाभाविक असून ती दडपली तर स्फोट होईल, अशी टिपण्णीही कोर्टाने केली आहे.

एएनआयशी बोलताना राव यांचे वकील मिहिर देसाई म्हणाले, कोर्टाने राव यांच्यासह पाच जणांना स्नानबद्ध ठेवण्याच्या दिलेल्या आदेशावरुन पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाया चुकीच्या असल्यानेच कोर्टही अस्वस्थ होते.

देशभरात झालेल्या या अटकेच्या कारवायांवर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका केली आहे. जाणून बुझून हा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशात आणीबाणी लागू झाल्याप्रमाणे या करवाया करण्यात आल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर, सरकारविरोधात आवाज उठवण्याऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचाही सूर पहायला मिळत आहे.