प्रदीर्घ आणि यशस्वी मोहिमेनंतर शनी ग्रहावर आदळले

नासा, इसा आणि आयसा यांनी संयुक्तरीत्या पृथ्वीवरून सोडलेले ‘कॅसिनी-हय़ुजेन्स’ हे अवकाशयान १३ वर्षे शनीचा अभ्यास केल्यानंतर इंधन संपल्यामुळे शुक्रवार, १५ सप्टेंबरला शनी ग्रहावर आदळले. आदळण्यापूर्वी शेवटच्या घटकेपर्यंत अवकाशयानाने शनी ग्रहाची आणि त्याच्या चंद्रांची छायाचित्रे पाठवली.

आमचे अवकाशयान शनी ग्रहाच्या वातावरणात शिरले असून त्यातून शेवटचे माहितीचे प्रक्षेपण प्राप्त झाले असल्याची माहिती नासाने एका ट्वीटद्वारे दिली.

कॅसिनी  मोहिमेचे प्रमुख अर्ल मेज यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करीत मोहीम संपल्याचे जाहीर केले. शनी ग्रहाच्या कक्षेत १,५०० किमी उंचीवर शिरल्यावर कॅसिनीचा संपर्क तुटला. संपर्क तुटल्याच्या ३० सेकंदांमध्ये अवकाशयान नष्ट झाले आणि त्याचे अवशेष शनी ग्रहाच्या वातावरणात पडल्याची माहिती नासाकडून देण्यात आली. भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५५ मिनिटांनी कॅसिनीचा संपर्क तुटला.

अमेरिकेची नासा, युरोपची इसा आणि इटलीची आयसा या देशांच्या संयुक्त अभियानाद्वारे ३.२६ अब्ज डॉलर खर्चून १५ ऑक्टोबर १९९७ला ‘केसिनी-हय़ुजेन्स’ हे अवकाशयान शनीच्या अभ्यासासाठी सोडण्यात आले होते.

द्रवरूप मिथेन असल्याचा शोध

हे यान २००४ मध्ये शनी ग्रहावर पोहोचले. यानाने शनीच्या ३०० फेऱ्या पूर्ण केल्या आणि शनी आणि त्याच्या कडीची अगदी जवळून छायाचित्रे घेतली. शनीच्या कडय़ातून २२ आठवडे फेऱ्या मारल्या. शनीचा मोठा चंद्र ‘टायटन’वर २७०० किलोमीटर जवळ गेले. त्याच्या १२७ फेऱ्या मारल्या आणि तेथे तरल स्वरूपात मिथेन असल्याचा महत्त्वाचा पुरावा या यानाने दिला.