News Flash

चिदम्बरम यांना अटक

चिदम्बरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली आणि ते तात्काळ निघून गेले.

पी. चिदम्बरम आणि त्यांचे पुत्र कार्ति या दोघांनी एकाच प्रकरणात ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत.

२७ तासांचा ‘अज्ञातवास’ संपताच सव्वा तास लांबलेले नाटय़ * आणखी चार कथित गैरव्यवहारांचीही चौकशी सुरू

नवी दिल्ली : तब्बल २७ तास केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती न लागलेले माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम हे अचानक रात्री साडेआठ वाजता काँग्रेस मुख्यालयात प्रकटले आणि त्यानंतर सव्वा तास लांबलेल्या नाटय़पूर्ण घडामोडींनंतर रात्री पावणेदहा वाजता त्यांना अटक झाली. त्यांच्याविरोधात आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केल्याने त्यांच्या अडचणींत वाढच होत आहे.

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन नाकारतानाच, कथित आर्थिक गैरव्यवहाराचे ते मुख्य सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असा गंभीर शेराही मारला होता. त्या वेळीच चिदम्बरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र चिदम्बरम यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सीबीआयने त्यांच्या घरी ‘दोन तासांत हजर व्हा,’ अशी नोटीसही चिकटवली. त्यानंतर बुधवारी सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांनी त्यांना परदेशी जाण्यापासून अटकाव करणारी नोटीसही जारी केली. अटकपूर्व जामिनासाठीची त्यांची याचिका शुक्रवारी दाखल करून घेतली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी रात्री साडेआठ वाजता अचानक चिदम्बरम हे काँग्रेस मुख्यालयात प्रकटले होते. आपण निर्दोष असून आपल्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही. न्यायासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपण लढणार आहोत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

चिदम्बरम यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली आणि ते तात्काळ निघून गेले. ते काँग्रेस मुख्यालयात आल्याचे वृत्त पसरताच सीबीआय पथकानेही मुख्यालयाकडे धाव घेतली. मात्र त्यांना कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत अडवले होते. सीबीआयचे दुसरे पथक त्यांच्या निवासस्थानी रात्री नऊच्या सुमारास पोहोचले. मात्र अंगणाचे प्रवेशद्वार उघडले जात नसल्याने एका अधिकाऱ्याला प्रवेशद्वारावर चढून अंगणात उडी मारावी लागली! तोवर ईडीचे पथकही थडकले. शंभराहून अधिक पोलिसांनीही घराभोवती मोर्चेबांधणी केली. चिदम्बरम यांच्या समर्थकांचीही गर्दी जमली होती. ईडी पथकाला घरात प्रवेश मिळाला. सीबीआयचे संचालक आर. के. शुक्ला हेदेखील तोवर दाखल झाले होते. रात्री पावणेदहा वाजता चिदम्बरम यांना अटक झाली आणि सीबीआय पथक त्यांना घेऊन मुख्यालयाकडे गेले.

चिदम्बरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना ‘परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळा’च्या (एफआयपीबी) माध्यमांतून परकीय गुंतवणुकीला परवानगी देताना काही बोगस कंपन्यांद्वारे कोटय़वधी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. यावरून आयएनएक्स-मीडिया आणि एअरसेल-मॅक्सिस या दोन प्रकरणांत चौकशी सुरू आहेच. त्यात बुधवारी आणखी चार प्रकरणांची भर पडली. चिदम्बरम अर्थमंत्री असताना ‘एफआयपीबी’चा गैरवापर झाल्याचा ‘ईडी’चा निष्कर्ष असून ही चारही प्रकरणे या मंडळाशीच संबंधित आहेत.

पी. चिदम्बरम आणि त्यांचे पुत्र कार्ति या दोघांनी एकाच प्रकरणात ३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत. तसेच त्यांच्या गैरव्यवहारांचे सीमेपलीकडेही लागेबांधे आहेत. त्यामुळे या दोघांची कोठडीत चौकशी अत्यावश्यक आहे, असा युक्तिवाद ‘ईडी’च्या वतीने न्यायालयात केला गेल्याचे समजते.

गैरव्यवहार कसा?

० ईडीच्या सांगण्यानुसार, चिदम्बरम आणि त्यांचे पुत्र कार्ति हे दोघे अनेक बोगस कंपन्यांचे थेट लाभार्थी आहेत.

० या कंपन्यांना मोठय़ा रकमेची लाच मिळाल्यानंतर चिदम्बरम यांनी अर्थमंत्री या नात्याने परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या वतीने अनेक कंपन्यांना गुंतवणूक परवानग्या दिल्या.

० या गैरव्यवहारांत या पिता-पुत्रांचा समान सहभाग होता. या दोघांनी अनेक परकीय बँकांमध्ये खाती उघडून त्यात ही लाचेची रक्कम जमा केली तसेच मलेशिया, ब्रिटन, स्पेन आणि इतर काही देशांत स्थावर मालमत्ता केली, असा आरोप आहे.

० कार्ति यांना ब्रिटिश व्हर्जिनिया बेटांतील एका कंपनीकडून भलीमोठी लाच मिळाल्याचे ‘पनामा पेपर्स’द्वारेही उघड झाले होते.

० एका बोगस कंपनीतील सर्व संचालक आणि समधारकांनी तर त्या कंपनीतील आपले सर्व समभाग कार्ति यांच्या कन्येच्या नावे जमा करण्याचे इच्छापत्रही केले होते, असे उघड झाले आहे.

नवी प्रकरणे कोणती?

* डिअ‍ॅजियो स्कॉटलंड लिमिटेड, कटारा होल्डिंग्ज, एस्सार स्टील लि. आणि एल्फोर्ज लि. या चार कंपन्यांना ‘परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळा’ने दिलेल्या परवानग्या संशयास्पद.

* आयएनएक्स मीडिया आणि एअरसेल मॅक्सिस या दोन प्रकरणांत ईडी आणि सीबीआय या दोघांनी चिदम्बरम यांच्या कोठडीतील चौकशीची मागणी केली आहे.

‘मी निर्दोषच!’

काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांसमोर आपली बाजू मांडताना चिदम्बरम म्हणाले की, ‘‘मी फरारी आहे, न्यायप्रक्रिया टाळत आहे, असा अपप्रचार पद्धतशीरपणे केला गेला. पण मी उलट न्यायासाठीच गेले २७ तास माझ्या वकिलांशी चर्चा करीत होतो. मी कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे. माझ्याविरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही, उलट एका प्रकरणात मला आधीच तपास यंत्रणेकडून निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. मी, माझा मुलगा किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही भ्रष्टाचार केलेला नाही. शुक्रवारी मी सर्वोच्च न्यायालयात हजर राहणार आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 4:27 am

Web Title: cbi arrests p chidambaram in inx media scam zws 70
Next Stories
1 उल्लेखनीय कार्याबद्दल १६ जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव
2 काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न ; फ्रान्सने पाकिस्तानला सुनावले
3 ट्रम्प मोदींशी काश्मीर प्रश्नी चर्चा करणार
Just Now!
X