केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाची प्रतिमा खराब होणार नाही. कारण सीबीआय देशासाठी आहे, एखाद्या व्यक्तीसाठी नाही. गरज भासेल तिथे तपास केला जाईल, असे मत सीबीआयच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या सीबीआयमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून या सर्वोच्च तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली जात आहे. याप्रकरणी सीबीआयने आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात लाचखोरीप्रकरणाचा तपास वेगाने आणि निष्पक्षतेने केला जाईल, अशी ग्वाही देत अस्थाना यांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास करत असलेल्या पथकात विश्वसनीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

त्याचबरोबर सीबीआयने संचालक आलोक वर्मा हे सहकार्य करत नसल्याच्या केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि सरकारच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सध्या सीबीआयच्या या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांना हटवण्याचा निर्णय सरकारने सीव्हीसीच्या शिफारशीनंतर घेतल्याचे, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले.

या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करुन सीबीआयमधील वातावरण दुषित केले असल्याचे सीव्हीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भांडणामुळे संस्थेच्या विश्वसनीयता आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे त्यांनी म्हटले.