शारदा चिट फंड घोटाळ्यात अडकलेले तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांना सीबीआयने चौकशीसाठी आपल्यासमोर हजर राहण्यास सांगितले असून यावर पक्षामध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे.
सीबीआयने आपल्याला हजर राहण्यास सांगितले आहे. सध्या एक-दोन दिवस मी दिल्लीत असून कोलकात्याला परतताच मी लगेच सीबीआय अधिकाऱ्यांना भेटेन, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी मुकुल रॉय यांनी सांगितले. व्यक्तिश: किंवा पक्षाचा रखवालदार म्हणून मी कधीही कुठल्याही प्रकारच्या अवैध किंवा अनैतिक कामात सहभागी झालेलो नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
सीबीआयचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याचा हा भाजपचा डाव आहे. लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये ते आमच्याशी राजकीयदृष्टय़ा लढू शकले नाहीत, म्हणून महापालिका निवडणुकांपूर्वी ते अशा क्लृप्त्या वापरत आहेत, असे तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओ’ब्रायन यांनी निवेदनात म्हटले आहे. सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, परंतु आम्हाला चूप बसवण्याचा त्यांचा इरादा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असेही डेरेक म्हणाले.