पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवा अशी मागणी आता सीबीआयने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. सीबीआयला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची कोठडी नको आहे. त्यांना तिहारमधील तुरुंगात न्यायालयीन कोठडी देऊन पाठवावे असे सीबीआयने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने मात्र ५ सप्टेंबरपर्यंत पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी कायम ठेवली आहे.

सोमवारी झालेल्या घडामोडींमध्ये पी. चिदंबरम यांना अंशतः दिलासा मिळाला. कारण सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात चिदंबरम यांची रवानगी करु नये असे म्हटले. तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवा असा प्रस्ताव चिदंबरम यांनी कोर्टाला दिला होता. त्यानंतर आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी पी.चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आता याच संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करावी असं म्हटलं आहे. तूर्तास तरी सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे