केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अंतर्गत कलह थांबण्याची चिन्हे नसल्याने अखेर यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर आता भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सीबीआयचे क्रमांक दोनचे अधिकारी आणि सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसाठी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अस्थाना यांना पुन्हा गुजरातमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी आपल्या सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या प्रकरणात चर्चेसाठी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि अस्थाना यांच्यावरील आरोपांची थोडक्यात माहिती दिली. अस्थाना यांच्यावर हैदराबाद येथील व्यावसायीक सना सतिशबाबू यांनी ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराने आरोप केला होता की, दुबईतील दोघे भाऊ मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांनी आपल्याकडून ५ कोटी रुपये मागितले होते. अस्थाना यांच्यावतीने त्यांनी ही लाच मागितल्याचा दावा त्याने केला होता. बाबूने हे पैसे दिल्याचा दावाही केला आहे. या प्रकरणात मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याशीही संबंध अल्याप्रकरणी तक्रारही दाखल झाली आहे. हे सर्व प्रकरण सीबीआयसाठी लाजिरवाणे असून वर्मा यांनी अस्थाना यांना हटवण्याची मागणीही केली आहे. हे घडणे अपेक्षितच होते अशी शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती.

दरम्यान, सीबीआयने सोमवारी आपल्याच कार्यालयावर छापा टाकत अस्थाना यांचे सहकारी देवेंदर कुमार यांना अटक केली होती. रात्री उशीरा अस्थाना यांच्या निलंबनासाठी अलोक वर्मा यांनी पावले उचलल्याचे सीबीआयच्या सुत्रांनी स्पष्ट केले. सोमवारी दिवसभर अधिकाऱ्यांमधील संघर्षाचे तीव्र पडसाद उमटले होते.