मुस्लिमांचा मताधिकार काढून घ्यावा, या शिवसेनेच्या मुखपत्रातील मागणीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सरकार घटनेला बांधील असून अशी मागणीच चुकीची असल्याचे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले. भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही सेनेवर टीकास्त्र सोडले
आहे.
घटनेनुसार प्रत्येकाला समान हक्क आहेत. त्यात भेद करता येणार नाही, असे नायडू यांनी सांगितले. एखाद्याचा मताधिकार काढून घ्या, हा चर्चेचादेखील विषय नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. सामाजिक, आर्थिक भेद न ठेवता मताधिकार हा सर्व नागरिकांना मिळालेला हक्क आहे. सरकार सर्व नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास बांधील असल्याचे नायडू यांनी सांगितले. अल्पसंख्याकांसह सर्वच जण देशाचे नागरिक असून, त्यात भेद करता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.
घटनेनुसार देशाचा कारभार चालतो, सर्वाना समान हक्क आहेत. त्यामुळे मताधिकार काढून घेण्याची कुणी मागणी केली तर आमचा त्याच्याशी संबंध नाही, असे भाजपचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले. वृत्तपत्रातील लेख किंवा चित्रवाणीवरील चर्चेद्वारे देश चालत नाही तर तो घटनेद्वारे चालतो. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्वाना मताधिकार आहे. ओवेसी बंधू विद्वेषाचे राजकारण करतात, मात्र संपूर्ण समाजाचा मताधिकार हिरावून घ्यावा, असे होणार नाही.

‘मतांच्या ध्रुवीकरणासाठी खटाटोप’
शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मागणीपासून भाजप हात झटकू शकत नाही, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी आता कारवाई करावी, अशी मागणी केली. एखाद्या भारतीयाचा अधिकार काढून घेण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही. यातून जातीयवाद्यांचे रूप उघड झाल्याची टीका ओवेसींनी केली. शिवसेना खासदारांची ही मागणी घटनाविरोधी आहे. केवळ ध्रुवीकरण व्हावे या हेतूने अशी मागणी करण्यात आल्याची टीका भाकपचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी केली आहे.

‘कुटुंब नियोजन  न करणाऱ्यांना मताधिकार नको’
उन्नाव (उ. प्र.): लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वाकरता कुटुंब नियोजनाचा  कायदा लागू करण्यात यावा, तसेच याचे पालन न करणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, असे वाद्ग्रस्त विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे, हिंदू जर नसबंदी करतात, तर मुस्लिमांनीही तो मार्ग चोखाळला पाहिजे. प्रत्येकासाठी सारखा कायदा असावा आणि आपल्या कार्यकाळात कुठल्याही समाजाचे तुष्टीकरण केले जाऊ नये, असे साक्षी महाराज रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.मुस्लिम व ख्रिश्चन यांची नसबंदी करावी असे मी म्हणत नाही, परंतु सर्वासाठी कुटुंब नियोजन आणि समान कायदा असायला हवा. हिंदूंनी ४ मुलांना जन्म द्यावा असे आम्ही म्हणतो तेव्हा ओरड होते असे साक्षीमहाराज म्हणाले.