रितिका चोप्रा, नवी दिल्ली

शिस्तप्रिय आणि राष्ट्रवादी युवकांची भक्कम फळी उभारण्यासाठी दर वर्षी १० लाख तरुण महिला-पुरुषांशी संपर्क साधून त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याबाबतच्या योजनेवर सरकारने चर्चा केली असल्याची विश्वसनीय माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

राष्ट्रीय युवक सक्षमीकरण योजना अथवा एन-यस असे या योजनेचे नाव आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ महिन्यांच्या प्रशिक्षणसाठी ठरलेले पाठय़वेतन देण्यात येणार असून संरक्षण, निमलष्करी दल आणि पोलीस दल यामध्ये नोकरी मिळण्यासाठी एन-यस आवश्यक पात्रता ठरविण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने गेल्या आठवडय़ात प्रस्तावित योजनेबाबत बैठक बोलाविली होती आणि त्याला संरक्षण, युवक व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंत्रालयातील प्रतिनिधी हजर होते, संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने या वेळी या विषयाबाबत सादरीकरण केले. काही अधिकाऱ्यांनी एन-यसबाबत विशिष्ट मते नोंदविली त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले एनसीसी अधिक सक्षम करण्याची सूचनाही करण्यात आली.

या योजनेमुळे युवकांमध्ये राष्ट्रवाद, शिस्त आणि स्वयंआदर ही मूल्ये जोपासली जातील आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला २०२२ पर्यंत विश्वगुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे, असेही या प्रस्तावामध्ये म्हटले आहे. लष्करी प्रशिक्षणासमवेतच युवकांना माहिती-तंत्रज्ञान कौशल्य, आपत्कालीन व्यवस्थापन आणि योग, आयुर्वेदद्वारे भारतीय मूल्ये शिकविण्यात येणार आहेत.