सीमेवरील सुरक्षाव्यवस्था भेदून देशात घुसलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केल्याच्या घटनेबाबत अहवाल द्यावा, असे गृहमंत्रालयाने पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सांगितले आहे.
भारत- पाकिस्तानदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेला खिंडार पाडण्यात आल्याबद्दल गृहमंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला असून, हल्ला करण्यासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज दहशतवादी सीमेपलीकडून भारतात कसे काय घुसले याचे स्पष्टीकरण देण्यास गृहमंत्रालयाने बीएसएफला सांगितले आहे.
अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमा भेदण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अशाच प्रकारे तीन शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी गुरुदासपूरमध्ये शिरून एका पोलीस अधीक्षकासह सात जणांना ठार मारले होते.
प्राथमिक अहवालानुसार, पंजाबमधील कुंपण न घातलेल्या एका नाल्याच्या मार्गाने दहशतवादी भारतात शिरले असावेत असा अंदाज असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताची पाकिस्तानला लागून ३३२३ किलोमीटरची सीमा आहे. यापैकी पंजाबमधील ५५३ किलोमीटर आणि जम्मू- काश्मीरमधील १२२५ किलोमीटर सीमेपैकी बहुतांश जागी कुंपण घालण्यात आले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या पंजाबमध्ये १७८, तर जम्मू- काश्मीरमध्ये ९० चौक्या (आऊटपोस्ट) आहेत.

‘कारवाई संपल्यावरच भारत-पाकिस्तान चर्चेचा निर्णय’
नवी दिल्ली : पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई संपुष्टात आल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठकीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे स्पष्ट केले.जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र पठाणकोट येथे दहशतवादी हल्ला झाल्याने नियोजित चर्चेचे भवितव्य काय, असे जेटली यांना विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

देशातील अंतर्गत सुरक्षेची स्थिती गंभीर -सोनिया गांधी
नवी दिल्ली : देशातील अंतर्गत सुरक्षेची स्थिती ‘गंभीर’ असल्याचे सांगून, दहशतवादाच्या धमक्या निष्प्रभ करण्यासाठी तसेच नागरिक आणि महत्त्वाची ठिकाणे यांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याची आशा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे. पठाणकोट हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली व्यक्त करतानाच या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत सोनियांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादविरोधी मोहीम गेल्या ४८ तासांपासून सुरू असल्याचे लक्षात घेता वायुदलाच्या महत्त्वाच्या मालमत्तेची सुरक्षाही चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले.