भारतीय रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे केटरिंग विभागाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतो आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने सेंट्रल रेल्वेकडून करण्यात खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. सेंट्रल रेल्वेने प्रति १०० ग्रॅम दह्यासाठी ९७२ रुपये, तर प्रति १ लीटर तेलासाठी १,२५३ रुपये मोजले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जातून हा तपशील समोर आला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अनेक वस्तूंची खरेदी त्यावर छापण्यात आलेल्या किमतीच्या कित्येक पट जास्त रकमेला केली आहे. मात्र यामध्ये ‘छपाईत चूक’ झाली असावी, असा बचाव रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याचेदेखील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘या प्रकरणात जुलै २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. मात्र त्यामध्ये काहीतरी लपवले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे पहिले अपील केले. यानंतर रेल्वेला १५ दिवसांमध्ये माहिती देण्याचे आदेश दिले गेले. मात्र तरीही कित्येक महिने माहिती देण्यात आली नाही. रेल्वेकडून माहिती दिली जात नसल्याने संशय आणखी बळावला. त्यामुळे दुसऱ्यांदा अपील दाखल केले. यानंतर संपूर्ण माहिती मिळाली,’ असे अजय बोस यांनी द हिंदूला सांगितले. बोस यांना मिळालेल्या माहितीनुसार अमूल दही ९७२ रुपये प्रति १०० ग्राम दराने खरेदी करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्याची किंमत २५ रुपये होती. रेल्वेचा केटरिंग विभाग तोट्यात असल्याचे समजल्याने बोस यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्याचा निर्णय घेतला.

‘मार्च २०१६ मध्ये ५८ लीटर रिफाइंड तेल (१,२४१ रुपये प्रति लीटर) खरेदी करण्यात आले होते. तर टाटा मिठाच्या १५० पॅकेट्ससाठी २,६७० रुपये (४९ रुपये प्रति पॅकेट) मोजण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात टाटा मिठाच्या एका पॅकेटची किंमत १५ रुपये इतकी आहे. पाणी आणि शीतपेयांच्या बाटल्या प्रति ५९ रुपये दराने खरेदी करण्यात आल्या,’ अशी माहिती आरटीआयमधून मिळाल्याचे बोस यांनी सांगितले.

‘रेल्वेने चिकन, तूरडाळ, बेसन आणि टिश्यू पेपरदेखील बाजारभावापेक्षा अधिक दराने केले. ५७० किलो तूरडाळ ८९,१६० (१५७ रुपये प्रति किलो), ६५० किलो चिकन १,५१,५८६ (२३३ रुपये प्रति किलो), १४८.५ किलो मूगडाळ ८९,६१० रुपये (१५७ रुपये प्रति किलो) आणि पाणी-शीतपेयांचे १७८ बॉक्स (एका बॉक्समध्ये १० बाटल्या) १,०६,०३१ (५९ रुपये प्रति बॉटल) खरेदी केल्या,’ अशी माहिती बोस यांनी दिली.