१ जुलैपासून देशात एक कर लागू झाला आहे ज्याचं नाव आहे जीएसटी. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर नेमकं काय स्वस्त झालं आणि काय महाग याबाबत देशातल्या जनतेच्या मनात संभ्रम आहे. त्याचमुळे ज्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत त्यांची यादी प्रकाशित करा अशी मागणी राज्यांकडून सातत्यानं जीएसटी परिषदेकडे करण्यात येत होती. याच मागणीचा विचार करून आता जीएसटी परिषदेने १५० वस्तूंची यादी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत वस्तूची  किंमत आणि किती जीएसटी लागला याची माहिती देण्यात येणार आहे.

याआधी जीएसटी परिषदेनं एक मोबाईल अॅपही सुरू केलं आहे. मात्र मोबाईल अॅपद्वारे सगळ्यांना ही माहिती मिळू शकतेच असं नाही म्हणून ती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत नव्या किंमती प्रकाशित करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर जीएसटी परिषदेनं हा निर्णय घेतला आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर किंमती कमी झालेल्या नाहीत असा मुद्दा काही मंत्र्यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीत पुढे आणला. लोकांनी जीएसटी स्वीकारला आहे पण त्यामुळे महागाई वाढली आहे अशीच त्यांची धारणा आहे असाही एक मुद्दा चर्चेसाठी पुढे आला त्यानंतर जीएसटीमुळे स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्या कंपन्या जीएसटी लागू झाल्याचा फायदा घेऊन ग्राहकांना फसवू पाहात आहेत त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असाही निर्णय जाहीर करण्यात आला. इतकंच नाही तर महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये जे अधिकारी आहेत ते सक्रियपणे दर नियंत्रित होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवून आहेत, इतर राज्यांमधील अधिकाऱ्यांनीही असंच काम करावं जेणेकरून सरकारला जीएसटी लागू झाल्यानंतर दरप्रणाली नेमकी कशी आहे हे समजण्यास मदत होणार आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. केंद्र सरकार आता या वस्तूंची मूळ किंमत आणि त्यावर लागलेला जीएसटी किती हे सांगण्यासाठी एक यादीच प्रकाशित करणार आहे. या यादीचा उपयोग ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून होईल असंही मत केंद्रानं व्यक्त केलं आहे.