जे नेटीझन्स संगणकावर काम करतात त्यांना किती ठिकाणी पासवर्ड द्यावे लागतात व ते विसरले तर काय पंचाईत होते याचा चांगला अंदाज आहे. मग नंतर पासवर्ड बदलून तो नवा करावा लागतो पुन्हा ते ‘सिक्युरिटी कोड’ टाइप करायचे व अनेक सोपस्कार त्यासाठी करावे लागतात, पण आता तुम्ही पासवर्ड विसरलात तरी नवीन पासवर्ड करताना तुम्हाला डोक्याला ताण द्यावा लागणार नाही. तुम्ही नुसता विचार मनात आणला तरी तुमचा पासवर्ड आपोआप बदलला जाईल.
यात तुम्हाला पासवर्ड टाइप करावा लागणार नाही. तुम्ही केवळ त्याबाबतचा विचार मनात आणायचा बस झाले काम. हे सगळे शक्य होणार आहे ते संशोधकांनी विकसित केलेल्या नवी वायरलेस हेडसेटमुळे.
मेंदूतील लहरींनी संगणकावर ओळख
तुम्हाला आता सगळय़ा साइट्ससाठी पासवर्ड लक्षात ठेवावे लागणार नाहीत. या पासवर्डमध्ये अनेक ठिकाणी अप्परकेस, विरामचिन्हे वगैरे असते. ते लक्षात ठेवणे व पुन्हा तसाच पासवर्ड लिहिणे शक्य नसते म्हणून कॅलिफोर्निया बर्कले स्कूल ऑफ इनफॉर्मेशनच्या संशोधकांनी असे उपकरण तयार केले जे तुमच्या मेंदूतील लहरीवर आधारित संगणक प्रमाणीकरण करते व तोच तुमच्या पासवर्डला पर्याय असतो. मेंदूच्या लहरी जैव संवेदक तंत्रज्ञानाने मोजून संशोधकांनी पासवर्डला पर्याय म्हणून पासथॉट्स हा प्रकार शोधला आहे. मॅशेबल या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे.
अवघ्या १०० डॉलरचा प्रश्न
साधारण १०० अमेरिकी डॉलर किमतीचा हा हेडसेट तुमच्या संगणकाला ब्लूटूथच्या माध्यमातून जोडला जातो. या हेडसेटचे संवेदक कपाळाला टेकवलेले असतात, त्यामुळे मेंदूतील लहरींचा इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (इइजी)तयार होतो.
न्यूरोस्काय माइंडसेट उपकरणाचा वापर
न्यूरोस्काय माइंड सेट हे उपकरण ब्लूटूथसारखे दिसते व तो उपयोगकर्त्यांस फारच अनुकूल आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूलहरी या एकमेव असतात, त्यामुळे जरी तुमचा पासथॉट कुणाला माहीत असताला तरी त्यांना तो चोरता येणार नाही, कारण त्यांचे इइझी -इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम वेगवेगळे असतात. हे उपकरण मोबाइल फोन, म्युझिक प्लेयर व इतर संगणन यंत्रांनाही वापरता येते.