भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्ली मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेलेला गौतम गंभीर अडचणीत सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गौतम गंभीर व अन्य व्यक्तींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. गौतम गंभीर दिल्लीतील एका बांधकाम व्यवसायिकाच्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करत होता. २०११ साली गाझियाबाद येथील इंदिरापूरम भागात ५० फ्लॅटधारकांनी या प्रकल्पामध्ये आपले फ्लॅट बूक केले होते.

मात्र बांधकाम व्यवसायिकाने फ्लॅटधारकांशी केलेला करार मोडत, फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर केला. २०१४ साल उलटून गेल्यानंतरही फ्लॅटधारकांना आपल्या घराचा ताबा मिळाला नाही. यानंतरही बांधकाम व्यवसायिक पैशाची मागणी करायला लागला. २०१५ साली स्थानिक नगरपालिकेने या प्रकल्पाला दिलेली मान्यता रद्द केली. यानंतर बिल्डरने ही बाब फ्लॅटधारकांपासून लपवून ठेवली. २०१५ सालानंतरही बांधकाम व्यवसायिकाने गौतम गंभीरकडून या प्रकल्पाची जाहीरात करत फ्लॅटचं बुकिंग सुरूच ठेवलं. ही बाब समोर आल्यानंतर फ्लॅटधारकांनी बांधकाम व्यवसायिक आणि गौतम गंभीरविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी पुढची कारवाई करत गौतम गंभीर आणि इतर व्यक्तींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.