तामिळनाडू सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत असून राजधानी चेन्नईत तर पाणी सोन्यापेक्षाही महाग असल्याचं राज्यसभा खासदाने सभागृहात सांगितलं. यावेळी पाणीटंचाईमुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याकडे लक्ष वेधण्यात आलं. राज्यसभेत देशभरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सीपीएमचे नेते टी के रंगराजन यांनी पूर्णपणे कोरडं पडणारं चेन्नई देशातलं पहिलं शहर ठरलं असल्याचं सांगितलं.

‘चेन्नईमधील अनेक लोक सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तसंच महापालिका आणि खासगी पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. पाण्याच्या टँकरची किंमत एक ग्रॅम सोन्यापेक्षाही जास्त आहे. आता तर सोनंही पाण्यापेक्षा स्वस्त झालं आहे. आणि हे सत्य आहे’, असं टी के रंगराजन यांनी सांगितलं.

धक्कादायक! दहा वर्षांत २१ शहरं होणार पाण्याला मौताद

यावेळी त्यांनी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईमुळे घरुन काम करण्यास सांगितलं असल्याचा तसंच राज्यातील अनेक रेस्टॉरंट्स बंद पडल्याचा दावा केला आहे. चेन्नईला वाचवण्याची जबाबादारी शेजारच्या राज्यावरही तितकीच असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

सीपीआय नेते डी राजा यांनीदेखील तामिळनाडू सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करत असून राज्यात लोक निदर्शन करत आहेत. परिस्थिती चिघळत चालली असून अशांतता निर्माण होत आहे असंही ते यावेळी म्हणाले. चेन्नईत पाण्यावरुन हेवे दावे सुरु असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान नीती आयोगाने दिलेल्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत देशभरातील २१ शहरांमधील भुगर्भातील पाण्याची पातळी पूर्ण खालावणार आहे. तर २०३० पर्यंत पिण्याच्या पाण्याची वाणवा असणार आहे. यामध्ये दिल्ली, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. १० कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्याला मौताद असेल.