छत्तीसगडमधील मतदानोत्तर चाचण्यांचे कल यायला सुरुवात झाली आहे. नक्षलींचा धोका लक्षात घेता येथे दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले होते. दरम्यान, या एकूण मतदानाचा अंदाज घेता ९० जागांपैकी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये काठावरची लढाई होणार असल्याचा अंदाज विविध सर्वेंमधून व्यक्त केला जात आहे.

टाइम्सनाऊ-सीएनएक्सच्या पोलनुसार, भाजपाला ४६, काँग्रेसला ३५, बसपाला ७ आणि अन्य पक्षांना २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. न्यूज २४-पेस मिडिया यांच्या सर्वेनुसार, भाजपा ३८, काँग्रेस ४८, बसपा आणि जनता काँग्रेस ४ तर अन्य पक्षांना २ जागा मिळतील. एबीपी-सीएसडीएसच्या सर्वेनुसार, भाजपा ३९, काँग्रेस ४६ आणि अन्य पक्षांना ५ जागा मिळतील.

तर इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार, काँग्रेस ५५-५६, भाजपा २१-३१ आणि अन्य पक्ष ४-८ असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच जन की बातनुसार, भाजपा ४४, काँग्रेस ४० तर अन्य पक्ष ६ जागांवर तर न्यूज नेशनच्या सर्वेनुसार, भाजपा ३८-४२, काँग्रेस ४०-४४, जेसीसी व इतर ४-८ आणि अन्य पक्ष ०-४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. मागच्या निवडणुकीत येथे भाजपाला ४९, काँग्रेसला ३९ आणि अन्य पक्षांना २ जागा मिळाल्या होत्या.

अनेक काळापासून मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱे डॉ. रमनसिंह यांनी सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी आक्रमक प्रचार केला. त्यांना राजनांदगाव मतदारसंघातून शह देण्यासाठी काँग्रेसने अटल बिहारी वाजपेयींची पुतणी करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली. या प्रचारात काँग्रेसने मायावती आणि अजित जोगी यांच्या युतीला भाजपाची बी टीम असे संबोधले होते.