सुकमा जिल्ह्यात (Sukma) नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान जखमी झाले आहेत. गेल्याच महिन्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यात २५ जवान शहीद झाले होते.

सुकमा जिल्ह्यात एप्रिलमध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर सीआरपीएफने नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली होती. छत्तीसगडमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा सीआरपीएफने केला होता. या कारवाईत सुकमामध्ये जवानांवर हल्ला करणारे नक्षलवादीही मारले गेल्याचे सांगण्यात येत होते. सीआरपीएफने ही कारवाई करून सुकमा हल्ल्याचा बदला घेतला, असे बोलले जात होते. सीआरपीएफच्या या कारवाईनंतर आज, शुक्रवारी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला आहे. यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रायपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तत्पूर्वी, सीआरपीएफने छत्तीसगडमध्ये १३ ते १५ मे दरम्यान शोधमोहीम राबवली. यात १५ नक्षलवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, एकही मृतदेह हाती लागला नसल्याचे सांगण्यात आले. या मोहीमेत एक सीआरपीएफचा जवानही शहीद झाल्याचे वृत्त होते. तर दोन जवान जखमी झाले होते.