जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. भारतीय लष्कराकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. जनरल बिपिन रावत यांनी मंगळवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.

बिपीन रावत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तिन्ही दल एक टीम म्हणून एकत्र काम करतील असा विश्वास व्यक्त केला. बिपिन रावत यांना यावेळी तुमच्यावर ठराविक राजकीय विचारसरणीचा प्रभाव असल्याच्या आरोपांसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “लष्कर राजकारणापासून दूर राहतं. जे सरकार सत्तेत आहे त्याच्या आदेशानुसार आम्हाला काम करावं लागतं”.

चीफ ऑफ डिफेन्स पद म्हणजे नेमकं काय ?
तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुखपद (चीफ ऑफ डिफेन्स) निर्माण करण्यात आलं आहे. या पदावर सर्वात प्रथम विराजमान होण्याचा मान जनरल बिपिन रावत यांना मिळाला आहे. संरक्षणप्रमुख पदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. संरक्षणप्रमुख हे संरक्षणमंत्र्यांचे मुख्य लष्करी सल्लागार असतील. संरक्षणप्रमुख पदनिर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात या पदनिर्मितीची घोषणा केली होती.