धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवण्यास न्यायालयाचा नकार

मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून मुलांची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. पावसाळ्यात मुंबईतील इमारती अधिक धोकादायक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील इमारती पावसाळ्यात टिकाव धरू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे जुन्या इमारतींमध्ये शाळा भरविण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्या. आदर्श कुमार गोएल आणि ए. एम. खानविलकर यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सेंट थॉमस हायस्कूलने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या शाळेची इमारत हटविण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला अहवाल दिला होता. तसेच जुन्या इमारतीत शाळेचे वर्ग भरविता येणार नाहीत, असेही सुनावले होते. शाळेच्या बाजूने वरिष्ठ वकील हुजेबा अहमदी यांनी युक्तिवाद केला. पावसाळ्यात मुंबईत पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यामुळे मुंबईतील इमारती अधिक धोकादायक ठरतात, असे न्यायालयाने सांगितले.

या शाळेत ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून पर्यायी व्यवस्था न झाल्यास या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे अहमदी यांनी न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.