जग अद्यापही करोना विषाणूंशी लढत असताना चीनमध्ये नुकतीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनमध्ये आयात केलेल्या काही गोमांस आणि कोळंबीच्या पाकिटांवर करोनाचे पॉझिटिव्ह विषाणू आढळून आले आहेत. अशा प्रकारे करोनाचे विषाणू एखाद्या पाकिटावर आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे.

ब्राझील आणि सौदी अरेबिया येथून आलेल्या या गोमांस आणि कोळंबीच्या पाकिटांची वुहानमधील आरोग्य विभागानं तपासणी केली यामध्ये हे विषाणू आढळून आले. या पाकिटांवरुन करोनाविषाणूचे तीन नमुने येथील प्रयोगशाळेने गोळा केले आहेत, जे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या घटनेनंतर चीनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “ही पाकिटबंद अन्नाची पाकिटं चीनमध्ये ७ ऑगस्ट रोजी क्विंगडाओ या शहरातून आली आहेत. त्यानंतर ती १७ ऑगस्ट रोजी वुहानकडे पाठवण्यात आली. तेव्हापासून ही पाकिटं फ्रीजरमध्ये ठेवण्यात आली होती.

याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर ब्राझिलच्या सरकारने इंटरनॅशनल न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, “चीनच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत आम्हाला अद्याप माहिती दिलेली नाही.” दरम्यान, जेव्हा पाकिटांवर करोनाचे विषाणू आढळून आले त्यानंतर लगेचच वुहानच्या फॅसिलिटी सेंटरमधील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली.

अर्जेंटिनावरुन आलेल्या काही गोमांसाच्या पाकिटांवरही चीनमध्ये करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. तसेच चीनच्या लांझोऊ शहरात कोळंबीच्या बंद पाकिटांवर करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. ही फ्रीज केलेली पाकिटं सौदी अरेबियातून आली आहेत. ही पाकिटं २१ ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये पोहोचली त्यानंतर ती लॉन्झोऊमध्ये ८ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर चीनच्या अधिकाऱ्यांनी जिथे करोनाचे नमुने आढळून आले तिथले कोल्ड स्टोरेज तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवले आहेत.