जगभरातील शेकडो देशांमधील आर्थिक गणितं करोनाच्या साथीमुळे कोलमडली आहेत. मात्र त्याचवेळी करोनाचा प्रादुर्भाव ज्या देशामधून सुरु झाला त्या चीनच्या निर्यातीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशामध्ये करोना मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर चीनविरोधात मोहीम सुरु केली होती. चिनी मालावर बंदी घालण्याच्या मागण्यांपासून ते अगदी चिनी कंपन्यांवर कठोर निर्बंध लागू करण्यापर्यंत अनेक गोष्टी ट्रम्प प्रशासनाने केल्या. मात्र चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारामध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. दोन्ही देशामध्ये ७५.४ अब्ज डॉलरचा वाढीव व्यापार झाला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनची एकूण निर्यात २६८ अब्ज डॉलरपर्यंत पोहचली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनमधून झालेली निर्यात ही २१.१ टक्क्यांनी अधिक आहे असं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळेच करोनाचा संकटाच्या काळात चीनने मागील वर्षीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत वाढीव व्यापार केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील ग्राहकांकडून चिनी वस्तूंना चांगली मागणी असल्याने निर्यात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. जकात विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंची टक्केवारी ४६ टक्क्यांनी वाढली आहे. दरांवरुन अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून व्यापारी युद्ध सुरु होते. असं असतानाही ही वाढ आश्चर्यकारक आहे.

ऑक्टोबरमध्ये चीनमधून होणारी निर्यात ११.४ टक्क्यांनी वाढली होती. तर चीनमधील आयातही पाच टक्क्यांनी वाढून १९२.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली होती. ऑक्टोबर महिन्यात चीनची आयात ४.७ टक्क्यांनी वाढली. या आकड्यांवरुन चीनची असर्थव्यवस्था करोनाचा संकटामधून पूर्णपणे सावरल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे चीनमधील सिनोवैक बायोटेकने एका स्थानिक कंपनीशी करार केला आहे. करोना लसीची उत्पादन क्षमता वाढवून दुप्पट करण्यासाठी ५१५ मिलियन डॉलरचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कंपन्यांनी सोमवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये याच महिन्यामध्ये प्रयोग म्हणून देण्यात आलेल्या लसीच्या परिणामासंदर्भातील माहिती समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सिनोवैकने आपल्या करोनावैक या लसीच्या परीक्षणाची क्षमता वाढवण्यासंदर्भात काम सुरु केलं आह. अनेक देशांमध्ये यासंदर्भात काम सुरु आहे. चीनमध्ये या लसीचे सकारात्कम परिणाम दिसून येत आहे. चीन बायोफर्मासिटिकल लिमिटेडने सोमवारी करोनावैकच्या निर्मतीसाठी मदत करण्यासाठी सिनोवैक लाइफ सायन्स या कंपनीमध्ये ५१५ मलियन डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या लसीच्या माध्यमातून चीनचा फाइजर आणि ऑक्सफर्डच्या लसींना टक्कर देण्याचा विचार आहे. सिनोवैकने इंडोनेशिया, टर्की, ब्राझील आणि चीलीसारख्या देशामध्ये करोना लसीच्या पुरवठ्यासंदर्भातील करार केला आहे.