बीजिंग : हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांचे आंदोलन सुरू असताना तेथील चीन समर्थक मुख्य कार्यकारी प्रमुख प्रमुख कॅरी लॅम यांना पदावरून हटवण्यात येणार असल्याचे वृत्त ‘दी फायनान्शियल टाइम्स’ने बुधवारी दिले आहे. गेले पाच महिने हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ निदर्शने सुरू आहेत. त्याला अलीकडच्या काळात हिंसक वळणही लागले होते. चीन समर्थक असलेल्या कॅरी लॅम यांच्यावर निदर्शकांनी नेहमीच टीका केली असून हाँगकाँग हे निम्न स्वायत्त शहर  मानले जाते. चीनच्या सरकारने आतापर्यंत लॅम यांना पाठिंबा दिला होता, निदर्शक हे दंगलखोर असल्याचे सांगून चीनने हिंसाचाराचा निषेधही केला होता.

‘दी फायनान्शियल टाइम्स’च्या वृत्तानुसार सरकार पातळीवर या सगळ्या प्रकरणावर चर्चा झाली असून त्यात कॅरी लॅम यांना पदावरून हटवण्याचे  ठरले असून हंगामी कार्यकारी प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. असे असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी परिस्थितीवर विसंबून आहे. आधी हाँगकाँग मधील परिस्थिती स्थिर करून मगच नवीन नेमणूक केली जाणार आहे. चीनने हिंसाचारापुढे मान तुकवली असे चित्र निर्माण होऊ  नये यासाठी मोठय़ा खुबीने नवीन व्यक्तीला पदावर आणावे लागणार आहे. कॅरी लॅम यांच्या कार्यालयाने या वृत्तावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. हॉँगकाँगमध्ये गेले वीस आठवडे आंदोलन सुरू असून तेथे कुठलाही राजकीय तोडगा अजून दृष्टिपथात आलेला नाही.

दर महिन्यागणिक हिंसाचार वाढत चालला आहे. या महिन्यात लॅम यांनी निदर्शकांना कुठलीच सूट देण्यास नकार देऊन वसाहतवादी काळातील आणीबाणी कायदा वापरला व निदर्शकांना मास्क घालण्यास बंदी केली.

हाँगकाँगमधील वाहतूकही निदर्शकांनी नंतर डबघाईस आणली होती. लॅम यांना पदावरून काढण्यात येणार असून त्यांच्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक मार्चपर्यंत होईल, असे अध्यक्ष जिनपिंग यांच्या चर्चेतून  स्पष्ट झाले आहे.

कॅरी लॅम यांच्या जागी हाँगकाँगचे पत प्राधिकरणाचे माजी प्रमुख नॉर्मन चॅन किंवा मुख्य प्रशासकीय सचिव हेन्ही टँग यांची नेमणूक होऊ शकते. सप्टेंबरमध्ये एक ध्वनिफीत प्रसारित झाली होती, त्यात लॅम यांनी पर्याय मिळाला तर पद सोडून देईन, असे म्हटल्याचे निदर्शनास आले होते. पण नंतर त्यांनी आपण पद सोडणार नाही असे स्पष्ट केले होते.