ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येत असतानाच चीनने भारताच्या शेजारी राष्ट्रांना भरघोस आर्थिक मदत करत भारताला कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशशी चांगले संबंध ठेवण्यावर मोदींनी भर दिला असून आता चीननेही बांगलादेशला तब्बल २४ बिलीयन डॉलरचे कर्ज देऊन भारतावर पलटवार केला आहे. यासोबतच ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशचा दौरा करणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्यावर भर दिला. बांगलादेशपासून नेपाळ आणि श्रीलंका यासारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक गुंतणूक करण्यावर मोदींचा भर आहे. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशला २ बिलीयन डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र आता मोदींच्या या खेळीला चीनने कर्जाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. चीन बांगलादेशला २४ बिलीयन डॉलर्सचे कर्ज देणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून चीन बांगलादेशमधील २५ प्रकल्पांचा विकास करणार आहे. यामध्ये वीज प्रकल्प, किनारपट्टीवर बंदराचा विकास करणे अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच महामार्गांचा विकास, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणांसाठीही चीन हातभार लावेल. याशिवाय शी जिनपिंग ब्रिक्स परिषद झाल्यावर बांगलादेशच्या दौ-यावरही जाणार असून ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशमध्ये दाखल होणार आहेत. या दौ-यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होईल अशी आशा बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री महमदू अली यांनी वर्तवली आहे.

चीनपाठोपाठ जपानही बांगलादेशला भरभरुन आर्थिक मदत करणार आहे. जपानने अत्यल्प व्याज दराने बांगलादेशला वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मोंदीच्या परराष्ट्र नितीला धक्का बसण्याची शक्यता आहे. चीनने बांगलदेश, म्यानमार, चीन आणि पूर्वोत्तर भारताला जोडण्यासाठी कॉरिडोर विकसित करण्याची योजना आखली आहे. पण भारत या कॉरिडोर अनुत्सूक आहे. तर दुसरीकडे जाणकारांच्या मते बांगलादेशला गुंतवणुकीची गरज आहे. त्यामुळे बांगलादेशला भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून मदतीची आशा आहे असे जाणकार सांगतात.