सिक्किम सीमेवरील डोकलाम भागात दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने मंगळवारी भारताला पुन्हा एकदा धमकी दिली. चिनी सैन्य भारतात घुसले, तर अराजक माजेल, अशा शब्दांमध्ये चीनकडून भारताला धमकी देण्यात आली. चीनकडून सिक्किम सीमेवरील डोकलाममध्ये रस्त्याची उभारणी केली जात असल्याने नवी दिल्लीला धोका आहे, हा भारताचा दावा अतिशय हास्यास्पद आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

‘चीन कोणत्याही देशाला आपली सीमा ओलांडण्याची परवानगी देत नाही. भारताने रस्ते निर्मितीचे कारण पुढे करुन बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आहे. डोकलाममध्ये प्रवेश करण्यासाठी भारताने दिलेले कारण हास्यास्पद आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले. ‘आम्ही भारताचा हास्यास्पद दावा मान्य केल्यास, कोणताही देश शेजारी राष्ट्रात घुसखोरी करु शकतो. भारताकडून सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. मग आता चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करावी का? चीनने असे पाऊल उचलल्यास भारतात अराजक माजेल,’ असा इशारा चुनयिंग यांनी दिला.

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सिक्किम सीमेवरील डोकलाममध्ये जोरदार तणातणी सुरु आहे. डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहे. १९८७ नंतर प्रथमच चीन आणि भारतात निर्माण झालेला तणाव इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत सुरु राहिला आहे. दोन महिन्यांपूर्वी डोकलाममध्ये चिनी सैन्याकडून रस्त्याची निर्मिती केली जात होती. या कामाला भारतीय सैन्याने आक्षेप घेतला. डोकलामचे स्थान भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या भागातील रस्ते निर्मितीच्या कामाला भारताने आक्षेप घेतला होता.