माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून आपण स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कामगार चळवळीतील लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. फर्नांडिस यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. जॉर्ज फर्नांडिस भारतीय राजकारणातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षाचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ संघटन कौशल्याचे फलित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. फर्नांडिस म्हणजे सर्वोत्तम नेतृत्व होते. ते धाडसी होते. त्यांनी देश घडवण्यात मोलाचे योगदान दिले, असे मोदींनी म्हटले आहे.