करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कार्यालयीन वेळासंदर्भातील पारंपारिक पद्धतीऐवजी नवीन धोरण अंमलात अणण्यासंदर्भातील विचार करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान उद्धव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीमध्ये करोना, लॉकडाउनबरोबरच देशभरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळेस आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंनी, करोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नसल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी, कार्यालयीन वेळांच्या बाबतीत आपली १० ते ५ ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी कार्यालयीन वेळांचे नियोजन करण्याची गरज असून त्याबद्दल केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे अशी मागणी केलीय.

या बैठकीमध्ये करोना काळामध्ये महाराष्ट्राने कशाप्रकारे वाटचाल केली याबद्दल बोलताना उद्धव यांनी, “राज्य शासनाची भूमिका कल करे सो आझ कर, आझ करे सो अभी अशी आहे,” असं म्हटलं. तसेच करोना कालावधीमध्येही राज्याचा विकास थांबला नाही. राज्यावरील करोना संकटावर मात काढत आम्ही मार्ग काढण्यासाठी लढत होतो असं उद्धव म्हणाले. आम्ही करोनाचे संकटाकडे संधी म्हणून पाहत वाटचाल करत असल्याचेही उद्धव यांनी म्हटलं. आम्ही आपत्तीला संधीत बदलत वाटचाल करत आहोत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आम्ही तंत्रज्ञानावर खूप भर दिला असून इंटरनेटची सेवा राज्यातील सर्व गावांमध्ये पोहचवण्याचे आमचा उद्देश आहे असंही उद्धव यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सांगितलं. भारत नेट मोहिमेच्या माध्यमातून इंटरनेटचं जाळं पसरवण्याचं काम सुरु झालं असून अद्यापही राज्यातील अडीच हजारहून अधिक दूर्गम भागातील गावाखेड्यांमध्ये इंटरनेट पोहचलेलं नाही याकडे उद्धव यांनी लक्ष वेधलं. या कामासंदर्भात केंद्राने लक्ष घालून राज्याला लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावं अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केलीय.

राज्यातील सर्वच गावांमधील नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवान सेवांचा आधिक चांगला लाभ मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचेही उद्धव यांनी सांगितलं. राज्यातील या प्रकल्पांसाठी केंद्राने प्राधान्याने मदत करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये केली.