वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर जागतिक महासत्तेचे मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे.

ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले.

अमेरिकेतील स्ट्राईप या ऑनलाईन पेमेंट सेवाप्रदात्या कंपनीने ट्रम्प यांच्याशी संबंधित व्यवहार थांबविले आहे. हे संकेतस्थळ अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्यासाठी प्रचार व प्रसार मोहिम आखत असे. शॉपिफाय तसेच गोफंडमी या ऑफलाईन व्यापार मंचानेही ट्रम्प यांच्यापासून फारकत घेतली आहे. गोफंडमी ही निधी उभारणी करणारी कंपनी आहे. ही कंपनी ट्रम्प समर्थकांच्या प्रवासाचे व्यवहार बघत असे.

ट्रम्प यांच्या विरोधात फोर्ब्सनेही रणशिंग फुंकले असून अमेरिकेतील कंपन्यांनी ट्रम्प यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊ नये, असा इशाराच दिला आहे.