गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर भारत-चीन सीमावादाचा प्रश्न चिघळलेला आहे. दोन्ही देशात सध्या चर्चा सुरू असून, व्हॅलीतील संघर्षापासून काँग्रेसकडून सातत्यानं मोदी सरकारकडे सवाल उपस्थित केले जात आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबद्दलची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.

गलवान व्हॅलीत १५ जून रोजी मध्यरात्री मोठा संघर्ष झाला. या संघर्षानंतर सीमावादाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या मुद्यावरून काँग्रेस मोदी सरकारवर सातत्यानं निशाणा साधताना दिसत आहे. काँग्रेसनं एक प्रसिद्ध पत्रक काढलं असून, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ते ट्विट केलं आहे. यात काँग्रेसनं भारत-चीन सीमावादावरून काही आरोप केले असून, पाच सवालही उपस्थित केले आहेत.

काँग्रेसचे सरकारला पाच सवाल…

१) देशातील वर्तमानपत्र, लष्कराचे अधिकारी, सॅटेलाईट छायाचित्र आणि आता खुद्द संरक्षण मंत्री यांच्या वक्तव्यातून भारताच्या हद्दीत घुसखोरी झाली नसल्याचा पंतप्रधान मोदी यांनी केलेला दावा का नाकारला जात आहे? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनच्या घुसखोरीविषयी खरी माहिती दिली नव्हती का?

२) चीनसोबत चर्चा करून प्रश्न सुटण्याची कोणतीही शाश्वती नाही, या संरक्षण मंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय आहे? चीननं केलेला कब्जा स्वीकारत मोदी सरकारनं हे मान्य केलं आहे का की, सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही?

३) चीन अजूनही डेपसांग सेक्टर व दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये बांधकाम करत आहे का? भारतीय हद्दीत होत असलेल्या बांधकामासंदर्भातमोदी सरकार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणती पावलं टाकत आहे?

४) चीननं अजूनही फिंगर ४ पासून फिंगर ८ मधील पॅगाँग त्सो लेक परिसरात कब्जा केलेला आहे का? चिनी सैन्याच्या ताब्यातून जमिनी सोडवण्यासाठी मोदी सरकारची काय रणनीती आहे?

५) मे २०२० पूर्वी असलेली परिस्थिती पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं आणि चीनला भारतीय सीमापासून पाठीमागे पाठवण्यासाठी आणखी किती वेळ लागणार आहे व सरकारची यासाठी कोणत धोरण आहे?