काँग्रेस पक्ष सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करणे पक्षासाठी कठिण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी पक्षाला एक सल्ला दिला आहे.

काँग्रेसने आपण आर्थिक संकटात आहोत हे वास्तव स्वीकारले पाहिजे. त्यात काहीही कमीपणा नाही. भाजपाकडे ज्या पैशांच्या थैल्या आहेत त्याचा सामना करण्यासाठी जागरुक नागरिकांना मदतीचे आवाहन केले पाहिजे असे टि्वट थरुर यांनी केले आहे. मागच्या पाच महिन्यांपासून काँग्रेसने विविध राज्यांमध्ये कार्यालय चालवण्यासाठी लागणारा निधी देणे बंद केले आहे असे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षामध्ये व्यावसायीकांकडून येणाऱ्या निधीमध्ये घट झाली आहे. सध्या काँग्रेसकडे पैशाची इतकी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, त्यांना त्यांच्या एका उमेदवाराच्या मदतीसाठी वर्गणी मागून पैसा जमा करावा लागला होता. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले होते.

जनतेकडून पैसा गोळा करा असा सल्ला थरुर यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने काही उमेदवारांसाठी लोकांकडून पैसा गोळा करण्याचा प्रयोग केला होता. चारच दिवसात पक्षाने ११ लाख रुपये गोळा केले होते.

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्य स्पंदन राम्या यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या आर्थिक चणचण आहे. भाजपाच्या तुलनेत आमच्याकडे निवडणुक बॉण्डमधून खूपच कमी पैसे मिळत आहेत. निवडणूक बॉण्ड हे राजकीय पक्षांना देणग्या देण्याचा नवा पारदर्शी प्रकार आहे. काँग्रेसजवळ आता यामार्गाने गरजेप्रमाणे पैसे येत नाहीत. त्यासाठी काँग्रेसला पैसे जमवण्यासाठी ऑनलाइन मदतीचे आवाहन करावे लागले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या जोडीच्या राजकारणाने काँग्रेसला जवळपास सर्वच मोठ्या निवडणुकांमध्ये हारवले आहे. भाजपा सध्या आपल्या सहकारी पक्षांसोबत देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर २०१३मध्ये १५ राज्यांत सत्तेत असलेली काँग्रेस सध्या २ राज्यांतच सत्तेत आहे.
काँग्रेसने मार्च २०१७ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भाजपाच्या तुलनेत एक चतुर्थांश निधी जमा केला आहे. भाजपाने या काळात सुमारे ६५,३१७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. भाजपाच्या या कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८१ टक्के वाढ झाली आहे. लोकशाही सुधार संघटन अंतर्गत काँग्रेस यंदा केवळ १४,२१३ कोटी रुपयेच जमा करु शकली आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.