इराकमध्ये बेपत्ता झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लोकसभेत निवेदन देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांनी गदारोळ घातल्याने सुषमा स्वराज निवदेन देऊ शकल्या नाही. दरम्यान याप्रकरणी सुषमा स्वराज यांनी संताप व्यक्त केला असून, हे अत्यंत दुर्देवी आहे, काँग्रेस मृतांचं राजकारण करत आहे असं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा स्वराज यांनी घटनेची सविस्तर माहिती देत काँग्रेसवर टीका केली.

‘राज्यसभेत सर्वांनी अत्यंत शांत आणि संयमाने माझं निवेदन ऐकलं. सर्वांनी मृतांना आदरांजलीदेखील वाहिली. मला वाटलं लोकसभेतही असंच काहीसं होईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून गोंधळ घालणा-या काँग्रेसने ज्योतीरादित्या सिंधिया यांच्या नेतृत्वात आजही गदारोळ घातला. हे अत्यंत दुर्देवी आहे’, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

‘आज काँग्रेसने अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण केलं. कदाचित काँग्रेस अध्यक्षांना वरील सभागृहात गदारोळ कसा झाला नाही याचं आश्चर्य वाटलं असावं, म्हणूनच मग त्यांनी सिंधिया यांना लोकसभेत गदारोळ घालायला सांगितलं. मृत्यूचंही राजकारण केलं जात आहे’, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.

‘मी स्वत: इतर देशांमधील परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला. मी स्वत: त्यांच्याकडे गेले आणि काही पुरावा आहे का विचारलं. हरवलेल्या व्यक्तीला मृत समजावं असं हे सरकार करत नाही’, असं सुषमा स्वराज बोलल्या. यावेळी सुषमा स्वराजांनी सांगितलं की, ‘काही पीडितांच्या नातेवाईकांनी मृत्यूची माहिती संसदेच्या आधी आम्हाला का देण्यात आली नाही अशी विचारणा केली आहे. पण ही संसदीय प्रक्रिया आहे आणि तिचं पालन करणं माझं कर्तव्य’.

‘फाईल बंद करण्यासाठी कोणाचाही मृतदेह सोपवून आपल्या लोकांचा असल्याचं सांगणं खूप मोठा गुन्हा ठरला असता’, असं सुषमा स्वराज यावेळी बोलल्या. ३८ जणांचा डीएनए सॅम्पल मॅच झाला असून, एका पीडिताचा ७० टक्के झाला आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

‘आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आलो आहोत की, बेपत्ता झाले जिवंत आहेत की मृत याचा आमच्याकडे काहीच पुरावा नाही. २०१४ मध्येही आम्ही तेच सांगितलं होतं आणि २०१७ मध्येही. आम्ही कोणालाही अंधारात ठेवलं नाही. आम्ही कोणालाही खोटी आशा दाखवली नाही. माझ्याकडे सबळ पुरावा असेल त्यादिवशीच मी जाहीर करेन हे सांगितल्याचा मला आनंद आहे. जेव्हा मृतदेह कुटंबियांकडे सोपवले जातील आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील तेव्हाच माझं काम पुर्ण होईल’, असं सुषमा स्वराजांनी सांगितलं.