गेल्या काही दिवसांपासून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलत आहे. देश परदेशातील तज्ज्ञांची माझा संपर्क झाला आहे. मी जे काही बोलत आहे ते त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर अवलंबून आहे. जोपर्यंत लॉकडाउन आहे तोवर करोनाचा व्हायरस थांबेल. परंतु जेव्हा पुन्हा लॉकडाउन संपेल तेव्हा हा करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागेल. लॉकडाउन हा केवळ हा पॉझ बटनाप्रमाणे आहे. करोनाला हरवण्यासाठी केवळ लॉकडाउन पुरेसं नाही, असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आज माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे अनेक मतभेद असतील. पण या मतभेदांची ही वेळ नाही. आपण एकजुटीनंच याचा सामना केला पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.

लॉकडाउन हा केवळ करोनाच्या विषाणूला थांवबू शकतो. हरवू शकत नाही. लॉकडाउन हे केवळ पॉझ बटनप्रमाणे आहे. आपण करोनाच्या चाचणीच्या क्षमता वाढवल्या तरच आपण करोनाशी लढू शकतो. एका जिल्ह्यात कमीतकमी ३५० चाचण्या होणं आवश्यक आहे. सध्या आपण चाचण्या वाढवायला पाहिजे. सध्या भारतात चाचण्या कमी आहेत, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. करोनामुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात सध्या बेरोजगारीही वाढू लागली आहे. येत्या काळात देशात खाद्यान्नाचीही कमतरता भासेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सध्या जे अन्नधान्य साठवण्यात आलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचंही ते म्हणाले. करोनाचं संकट हे फार मोठं आहे. त्यामुळे सर्वांमध्ये एकजुट हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- १० लाख लोकांमागे फक्त १९९ चाचण्या, राहुल गांधींनी सांगितल्या १० महत्वाच्या गोष्टी

लघु उद्योगांसाठी तरतूद हवी

लघु उद्योगांना वाचवण्यासाठी सरकारनं तरतूद करायला हवी. लहान कंपन्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. केंद्र सरकारनं बेरोजगारी कमी करण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या. तसंच गरीबांना तातडीनं आर्थिक मदत द्यायला हवी. याव्यतिरिक्त राज्यांच्या सर्व गरजा केंद्र सरकानं पूर्ण करायला हव्या. केंद्र सरकारनं जीएसटीची रक्कमही सर्व राज्य सरकारांना द्यावी, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही – राहुल गांधी

काही प्रश्न आजही अनुत्तरीत

मला बाकी देश काय करतात यात रस नाही. मला भारत काय करतो यात रस आहे. आजही अनेक प्रश्नाची उत्तरं मिळालं नाहीत. करोनानंतर देशासमोर आर्थिक प्रश्न निर्माण होतील, याबद्दल काय करणार हे सांगण्यात आलं नाही. तसंच देशात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय, अन्नधान्याची कमतरता भासेल यावर काय विचार करण्यात आला आहे हेदेखील सांगण्यात आलं नाही. करोनाची ही लढाई मोठी आहे. त्याचा सामना योग्य ती धोरणं आखूनच करावा लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- बेरोजगारीचं संकट गडद होणार, मोठ्या पॅकेजची गरज- राहुल गांधी

टेस्टिंग किट हेच मुख्य शस्त्र

सर्वांना टेस्टिंग किटची गरज आहे. आज टेस्टिंग हेच आपल्याकडे मुख्य शस्त्र आहे. आपण चाचण्या केल्या तरच करोनासारख्या आजाराला हरवणं शक्य आहे. अन्यथा आपण केवळ करोनाच्या मागेच पळत राहू, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- करोनाशी लढाई सुरु आहे, आजच विजयाची घोषणा नको- राहुल गांधी

धान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज
आपण साठवलेलं धान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यापर्यंतही धान्य पोहोचलं पाहिजे. आपल्याकडे अधिकचं धान्य साठवलं आहे. आता पुन्हा तो साठा वाढेल, त्यामुळे धान्य गरजूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो डाळ, १ किलो साखर दर आठवड्याला देण्यात यावं, असंही त्यांनी नमूद केलं.