काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा परदेश दौरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण ठरलं आहे, काँग्रेसचा वर्धापन दिन. देशभरात पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा १३६वा स्थापना दिवस साजरा करत असून, वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येलाच राहुल गांधी इटलीला निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीपासून गळीतगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून दोन गट पडले आहेत. पुर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असलेली काँग्रेस १३६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल गांधींनी नेतृत्व करण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांच्यावर मित्रपक्षांकडून टीकाटिप्पणी होत असतानाच या दौऱ्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.

काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी वाच्यता करण्यात आली नसली, तरी ते लवकरच भारतात परत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनालाच राहुल गांधी अनुपस्थितीत असल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले,”राहुल गांधी हे वैयक्तिक छोट्या दौऱ्यावर असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं आहे. ते लवकरच भारतात परतणार आहेत,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

ऐन काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मध्येच राहुल गांधी परदेशात गेल्यानं त्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ते नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात गेल्याचं बोललं जात आहे.