सुमारे ९ तासांच्या चौकशीनंतर गुरूवारी रात्री ९ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वढेरांना सोडून दिले. त्यांना नेण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वढेरा यांच्या पत्नी प्रियंका गांधी ईडीच्या कार्यालयात आल्या होत्या. काळा सूट परिधान करून आलेल्या प्रियंका या ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊन थांबल्या. त्यानंतर काही वेळाने वढेरा हे कार्यालयातून बाहेर आले आणि दोघे मिळून तेथून गेले. बुधवारी पहिल्यांदाच वढेरा हे ईडीसमोर उपस्थित राहिले होते. त्यावेळीही प्रियंका या त्यांना सोडण्यासाठी गेल्या होत्या.

ईडीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे वढेरा यांनी विदेशात अवैधरित्या संपत्ती जमवल्याप्रकरणी आणि मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणी गुरूवारी दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले. ते सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी दिल्लीतील जामनगर हाऊस येथील ईडीच्या कार्यालयात आले होते. त्याच्या एक तास आधी त्यांच्या वकिलांची टीम तिथे पोहोचली होती. बुधवारी पहिल्यांदा वढेरा यांची साडेपाच तास चौकशी झाली होती. त्यांची पुन्हा एकदा चौकशी होईल याची शक्यता बुधवारीच व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांची लंडनमध्ये नऊ ठिकाणी संपत्ती असून त्याची कोटींमध्ये किंमत असल्याचा आरोप आहे. २००५ ते २०१० दरम्यान वड्रा यांनी ही संपत्ती खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे.