News Flash

गोव्यात राजकीय भूकंप करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका, म्हणाले…

भाजपानंही राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते. परंतु त्यांच्या वक्तव्याला २४ तासही उलटत नाही तर काँग्रेसनंच त्यांना मोठा दणका दिला आहे. आपण विरोधी पक्षातच बसणार असल्याचं गोवा काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. आमच्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण संपलं असून सध्या गोव्याच्या राजकारणात व्यस्त आहोत असं संजय राऊत म्हटलं होतं. “महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही फ्रंट उभा केला जात आहे. गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केलं आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात,” असा टोलाही त्यांनी लगावला होता.

गोव्यात ४० पैकी ३० आमदार हे भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असं चोडणकर यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला.

२०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त १७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपा फक्त १३ जागांवर विजय मिळवू शकला होता. पण भाजपाने संधी साधत इतर पक्षांच्या मदतीने सत्तास्थापन केली होती. भाजपाला गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिला होता. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून राज्यात आणण्यात आलं होतं. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 10:14 am

Web Title: congress girish chodankar on shiv sena sanjay raut government formation in goa jud 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल
3 हैदराबादमध्ये महिलेला जाळल्याप्रकरणी चौकशी
Just Now!
X