पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या वीरमगाम या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार लखभाई भारवाड यांनी भाजपच्या डॉ. तेजश्रीबेन पटेल यांचा पराभव केला असून या पराभवामुळे भाजपची नाचक्की झाली आहे.

वीरमगाम हा मतदारसंघ हार्दिक पटेल यांचा गड समजला जातो. या मतदारसंघात हार्दिक पटेल यांचे गाव असून या मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणाऱ्या डॉ. तेजश्रीबेन पटेल यांनी यंदा भाजपत प्रवेश केला. भाजपनेही त्यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने लखभाई भारवाड यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्रीबेन पटेल यांना ६९, ६३० मते मिळाली. तर काँग्रेसच्या लखभाई भारवाड यांना ७६ हजार ७१८ मते मिळाली. ध्रूवकुमार जाधव आणि कुंवरजी ठाकोर या अपक्ष उमेदवारांना अनुक्रमे १२,०६९ आणि १०, ८३६ मते मिळाली. याचा फटका भाजपला बसल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी देखील निवडणुकीत बाजी मारली. वडगाव मतदारसंघातून जिग्नेश १९,६९६ मतांनी विजय मिळवला. तर अल्पेश ठाकोरने राधनपूर विधानसभा मतदारसंघातून १४,८५७ मतांनी बाजी मारली.