काँग्रेस नेता आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. कधी मच्छिमारांसोबत समुद्रात उडी मारल्यामुळे तर कधी विद्यार्थिनीसोबत पुशअप्स काढल्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. आता एका १२ वर्षाच्या मुलाला दिलेलं वचन राहुल गांधी यांनी पूर्ण केलंय. कन्याकुमारीत एका १२ वर्षाच्या मुलाची भेट घेतल्यावर राहुल गांधींनी त्याला मदत करण्याचा शब्द दिला होता, अखेर राहुल यांनी त्यांचा शब्द पाळलाय.

मार्च महिन्याच्या सुरूवातीला राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यासाठी कन्याकुमारीला गेले होते. एक मार्च रोजी त्यांनी आपला ताफा एका चहाच्या स्टॉल जवळ थांबवला. त्यावेळी, रस्त्याच्या कडेला पायात चप्पल नसलेला अँटनी फेलिक्स नावाचा एक लहान मुलगा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के कामराज यांचं पोस्टर हातात घेऊन उभं असल्याचं राहुल गांधी यांनी पाहिलं.

त्यानंतर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्या मुलाच्या दिशेने चालत गेले व त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी संवाद साधला. त्याच्याशी गप्पा मारताना राहुल यांनी त्याला आवडीनिवडी विचारल्या. कशाची आवड आहे असं त्यांनी त्या मुलाला विचारलं, त्यावर मला धावायला आवडतं असं उत्तर त्याने दिलं. पाचवीत शिकणाऱ्या फेलिक्सने आपण ११ मीटर शर्यतीतीतल उत्तम धावक असल्याचं राहुल यांना सांगितलं. तो अ‍ॅथलिट असल्याचं समजताच तू माझ्यापेक्षा जोरात धावू शकतो का असा मजेशीर प्रश्न त्यांनी त्याला विचारला आणि मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? अशीही विचारणा केली. शिवाय लवकरच तुझ्यासाठी स्पोर्ट्स शूज पाठवून देतो असा शब्दही राहुल यांनी फेलिक्सला दिला होता.


अखेर आता राहुल यांनी आपला शब्द पूर्ण करताना फेलिक्ससाठी नवीन स्पोर्ट्स शूज गिफ्ट केले आहेत. तामिळनाडू युथ काँग्रेसने याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली.