काँग्रेस नेते राहुल गांधी इटली दौऱ्यावर असून यावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन सुरु असताना आणि काँग्रेसचा स्थापना दिवस असतानाही राहुल गांधी परदेशात गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपा नेत्यांकडून राहुल गांधींच्या परदेशात दौऱ्यावर टीका केली जात असून यानिमित्ताने शेतकऱ्यांना आपली दिशाभूल करुन घेऊ नका असं आवाहन केलं जात आहे. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांनी राहुल गांधीच्या इटली दौऱ्यामागचं कारण सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, “जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार…राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत”.

“राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यातच करोनाचं भयंकर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलं होतं. सरकारने लक्ष दिलं नाही. लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असताना सरकार लक्ष द्यायला तयार आहे का? गेल्या सहा वर्षापासून पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेण्यास तयार नाहीत. त्यावर तर कोणी बोलत नाही. देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने कधी उत्तर दिलं नाही ही महत्वाची बाब आहे. आणि त्यावर ज्या एकमेव नेत्याने संघर्ष केला आहे ते म्हणजे राहुल गांधी आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मोदींनी गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेची वाट लावली. लाखो शेतकरी रस्त्यावर बसले आहेत त्याबद्दल एक शब्द तुम्ही बोलत नाही. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात त्याची चर्चा करायला तयार नाही”.

यावेळी त्यांनी ईडी नोटीस पाठवण्यावरुनही टीका केली. ते म्हणाले की, “भाजपाच्या विरोधात जे बोलतात त्यांना ईडीच्या नोटीस येतात. इतिहास पाहिला तर संजय राऊत, एकनाथ खडसे, शरद पवार यांना नोटीस आली आहे. भाजपाच्या एका नेत्यालाही नोटीस आलेली नाहीत. ईडी, सीबीआयने आपलं ऑफिस भाजपाच्या कार्यालयात शिफ्ट करावं म्हणजे चर्चेत वेळ जाणार नाही”.