निषेध करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. कधी काहीजण भयंकर आक्रमक होतात, तर कधी सौम्य पद्धतीने निषेध केला जातो. पण काही वेळेस निषेध करताना मर्यादा ओलांडली देखील जाते. कर्नाटकच्या विधानसभेत असाच काहीसा प्रकार घडला असून त्याचा भुर्दंड संबंधित आमदाराला बसला आहे. आपल्या मागण्यांसाठी हे आमदार महोदय कर्नाटक विधानसभेच्या व्हेलमध्ये आले आणि त्यांनी चक्क शर्टच काढला! त्याची शिक्षा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केलं आहे. द न्यूज मिनटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं झालं काय?

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्ये देखील विधिमंडळाची दोन सभागृह आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अर्थात कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. तर कर्नाटकच्या विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसचे भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी इतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत व्हेलमध्ये आले. घोषणाबाजी करता करता संगमेश यांनी अचानक त्यांचा शर्ट काढला, असं न्यूज मिनटच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कगेरी यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेसच्या आमदारांना नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली. मात्र, संगमेश कुणाचंही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर, अध्यक्षांनी त्यांना ७ दिवसांसाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं. आपण कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करत नव्हतो तर फक्त न्यायाची मागणी करत होतो, अशी प्रतिक्रिया नंतर संगमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.