ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्यानंतर आता अजून एका तरुण काँग्रेस नेत्यानं पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर आणि पार्टी हायकमांडवर टीका करत हा नेता बाहेर पडल्यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी हायकमांडवर टीका करत पक्षातील सर्व पदांचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. रुपज्योती कुर्मी २१ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने चिंतन करण्यची गरज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

..म्हणून काँग्रेसची वाईट अवस्था!

रुपज्योती कुर्मी यांनी पक्ष सोडण्याचं कारण देखील स्पष्ट केलं आहे. “मी काँग्रेस सोडतोय कारण पार्टी हायकमांड आणि गुवाहाटीमधले नेते फक्त ज्येष्ठ नेत्यांनाच प्राधान्य देतात. आम्ही त्यांना सांगितलं होतं की काँग्रेसला यंदा निवडणूक जिंकण्याची पूर्ण संधी आहे. आपण AIUDF सोबत आघाडी करायला नको. ती चूक ठरेल. आणि ती चूक ठरली”, असं कुर्मी यांनी सांगितलं. “काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्यांचं म्हणणं ऐकत नाही. म्हणून काँग्रेसची सर्व राज्यांमध्ये वाईट अवस्था झाली आहे. राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीयेत. जर ते केंद्रस्थानी असतील, तर पक्ष पुढे जाऊ शकत नाही”, असं देखील रुपज्योती कुर्मी म्हणाले आहेत.

 

आमदारकीचा राजीनामा आणि निलंबनाची कारवाई

दरम्यान, रुपज्योती कुर्मी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांनतर आणि पक्ष सोडण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रुपज्योती कुर्मी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुपज्योची कुर्मी हे आसामच्या जोरहाट जिल्ह्यातल्या मरियानी मतदारसंघातून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकांपूर्वी एप्रिल महिन्यात काँग्रेसनं AIUDF सोबत आघाडी केली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसला आसाममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भाजपानं ही निवडणूक जिंकत आसाममध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली.

“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला इशारा!

तीन तरुण नेत्यांचा काँग्रेसला रामराम

नुकतेच काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी देखील पक्षाच्या कार्यपद्धतीवरच टीका केली होती. त्याआधी ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपाला हात दिला आहे. तर या पार्श्वभूमीवर सचिन पायलट हे राहुल गांधींच्या जवळच्या गोटातलं अजून एक नाव भाजपामध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.