पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवार ‘नमो’ अॅपच्या साह्याने तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसने कॅग आणि सुप्रीम कोर्टलाही सोडले नाही. काँग्रेसने लष्कर, कॅग आणि सुप्रीम कोर्टचा अपमान केला आहे. जे लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण त्यांना कोर्टाचा निर्णय अमान्य होता. असे म्हणत राफेल कराराचे नाव न घेता काँग्रेसच्या विरोधाला मोदी यांनी उत्तर दिले. तसेच काँग्रेसने सरन्यायाधीशांविरोधात (चीफ जस्टिस ऑफ इंडिया) महाभियोग आणण्याचा प्रयत्न केला.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, निवडणुकीत पराभव झाला की काँग्रेस आपल्या पराभवाचे खापर EVM वर फोडते, मात्र जिंकल्यानंतर आलेला निर्णय मान्य करते. काँग्रेसचा डीएनएमध्ये आणखी तसाच आहे. निवडणुकीआधी ‘ईव्हीएम’विरोधात शंख करायचा. निवडणुकीनंतर निकाल आपल्या बाजूने लागले तर काहीच बोलायचं नाही आणि निकाल विरोधात गेले तर मात्र ईव्हीएम सदोष आहे, असा कांगावा करायचा, असे काँग्रेसचे सोयीचे धोरण आहे. काँग्रेस लोकांमध्ये फक्त EVM बाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर EVMचे रडगाणे गातात आणि जिंकल्यानंतर मात्र ईव्हीएम सदोष आहे.

काँग्रेसकडून जे धोकादायक खेळ खेळले जात आहेत, त्याबाबत जनजागृती करत राहण्याची गरज आहे. लोकशाही अधिक बळकट करूनच काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं जाऊ शकतं, असेही मोदी म्हणाले.