छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परप्रांतीयांचा मुद्दा मांडत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. याऊलट आऊटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला. निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन रिक्त पदे भरले जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन मोदी सरकार आणि मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यावर टीका केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे भ्रष्ट मुख्यमंत्री असून त्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आले होते. पाकिस्तानमध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्याने पंतप्रधानांनाही तुरुंगात जावे लागले. पण छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्या मुलावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. चिटफंड घोटाळा आणि पीडीएस घोटाळ्यातही रमणसिंह यांचा सहभाग होता. पीडीएस घोटाळ्यातील नोंदवहीत मुख्यमंत्री मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पैसे दिल्याचा उल्लेख होता. हे दोघे कोण आहेत, हे रमणसिंह यांनी जनतेला सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल. तसेच छत्तीसगडमधील काम आऊटसोर्स केले जाणार नाही. यामुळे परप्रांतीयांऐवजी स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल,असेही त्यांनी सांगितले. सध्या देशाचे चौकीदार भ्रष्टाचार, बेरोजगारी, नोटाबंदी अशा कोणत्याही विषयावर बोलत नाही, असे त्यांनी नमूद केले.

मोदींच्या काळातच नीरव मोदी, विजय मल्ल्या हे बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळाले. मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे ३ लाख ५० हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज त्यांना माफ करता आले नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली. मी खोटी आश्वासनं देत नाही, खोटंही बोलत नाही. जे बोलतो ते करुन दाखवतो. मी एकदा खोटं बोलून सत्ता मिळवीन. पण दुसऱ्यांदा मी जेव्हा येईन तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्हाला एक जिल्हा किंवा विशिष्ट धर्म किंवा जातीसाठी नव्हे तर सर्वांसाठी काम करायचं आहे, असे त्यांनी सांगितले.