आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची निपाह व्हायरसशी तुलना केली आहे. राहुल गांधी हे निपा व्हायरसप्रमाणे आहेत. जो पक्ष त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येतो, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. विज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

विज यांनी दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधींबाबत ट्विट केले होते. परंतु, नंतर त्यांचे हे ट्विट व्हायरल झाले. राहुल गांधी हे निपा व्हायरस सारखे आहेत. त्यांच्या संपर्कात जो पक्ष येईल तो संपुष्टात येईल, असा टोला त्यांनी लगावला होता. गेल्याच आठवड्यात जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार कर्नाटकात अस्तिवात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विज यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी सध्या आई सोनिया गांधी यांच्याबरोबर परदेशात गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये निपा व्हायरसची साथ आल्याचे दिसून येत आहे. केरळमधील कोझिकोड येथे हे प्रकरण सर्वांत आधी समोर आले. आतापर्यंत तेथील १४ लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वटवाघळांमुळे हा व्हायरस पसरतो असे सांगितले जाते.

अनिल विज यापूर्वी आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकले आहेत. हरयाणामध्ये खुल्या जागेत नमाज पठण करण्यावरून झालेल्या वादावेळीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कधी-कधी एखाद्याला गरज पडली तर ते धर्माचे स्वातंत्र्य आहे. पण एखाद्या जागेवर कब्जा मिळवण्याच्या हेतून नमाज पठण करणे चुकीचे आहे. त्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते. तर गुजरात निवडणुकीवेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता विजय यांनी एक ट्विट केले होते. १०० श्वान एकत्र आले तरी ते एका सिंहाचा सामना करू शकणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य त्यावेळीही केले होते. गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला होता.