नियमित तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री साडेसातच्या सुमारास भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदी हे सुमारे ५० मिनिटे रूग्णालयात होते. मोदींनी वाजपेयींच्या नातेवाईकांशी संवाद साधला आणि डॉक्टरांशी वाजपेयींच्या प्रकृतीविषयी चर्चा केली.

तत्पूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सांयकाळच्या सुमारास राहुल गांधी हे एम्स रूग्णालयात गेले होते. वाजपेयी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांबरोबर गांधी यांनी चर्चा केली. प्रकृती अस्वास्थामुळे वाजपेयींना सकाळी साडेअकराच्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनीही एम्स रूग्णालयात धाव घेतली. वाजपेयींना उद्या डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली.  एम्स रूग्णालयाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह हेही एम्स रूग्णालयात पोहोचले होते.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वाजपेयींना एम्समध्ये दाखल केले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वाजपेयी अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. वाजपेयींनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. त्यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात दाखल